‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आयसिसला शांतता चर्चा करण्याचा खुला प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावाला उत्तर म्हणून आयसिसने रविशंकर यांना एका ओलिसाच्या शिरच्छेदाचे छायाचित्र पाठवून धोक्याचा इशारा दिला आहे. खुद्द रविशंकर यांनीच शुक्रवारी याबाबत खुलासा केला.
रविशंकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही आयसिसकडे शांततेचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यांनी पाठविलेल्या उत्तरावरून त्यांना कोणत्याही प्रकारची चर्चा नको असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अशा घातक संघटनांवर कडक कारवाई हाच योग्य पर्याय ठरेल.
सर्व विचारधारा एकत्र नांदाव्यात आणि सर्व धर्म एकत्र यावेत या उद्देशाने आयसिसला शांतता प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पण त्यांनी तो फेटाळून लावला. त्यामुळे माझ्या सर्व आशा फोल ठरल्यात, असेही ते पुढे म्हणाले. त्रिपुरा येथे रविशंकर यांनी तीन दिवसीय शांतता शिबीर घेतले. ते संपवून आज रविशंकर कोलकात्याला रवाना झाले.