जम्मू- काश्मीर येथील श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा ३१ तासांच्या चकमकीनंतर खात्मा करण्यात यश आले. यातील एका दहशतवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

श्रीनगरमधील सीआरपीएफच्या तळावर सोमवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पहाटे साडे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी तळात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहारेकऱ्याला बॅकपॅक आणि शस्त्रे बाळगणाऱ्या दोन संशयित व्यक्ती दिसल्यानंतर त्याने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४९ व्या बटालियनमधील एक जवान शहीद झाला होता. जवानांकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर दहशतवाद्यांनी करण नगरातील एका पडक्या घरात आश्रय घेतला. यानंतर सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला होता. मंगळवारी दुपारपर्यंत ही चकमक सुरु होती. सुरक्षा दलांनी घराजवळ स्फोटही घडवला होता. चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगितले जाते. मात्र, जम्मू- काश्मीर पोलिसांनी अद्याप फक्त एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.या चकमकीदरम्यान स्थानिकांनी सैन्यावर दगडफेक केल्याचे वृत्तही ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र या वृत्तालाही सुरक्षा दलांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान, पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आपल्या सदस्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा दावा संघटनेचा काश्मीरचा प्रमुख मेहमूद शाह याने ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात केला होता. शनिवारी सुंजवान येथील लष्करी तळावरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते. तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता.या हल्ल्यांमुळे सुरक्षा दलांच्या तळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकला इशारा दिला. पाकिस्तानला किंमत चुकवावी लागेल, असा सज्जड इशाराच त्यांनी सोमवारी दिला होता. भारताकडे सबळ पुरावे असून ते पाकला दिले जातील. यापूर्वीही भारताने पाकला पुरावे दिले, पण पाकने कारवाई केली नव्हती, असे त्यांनी म्हटले होते.