News Flash

श्रीनगरमध्ये हिसाचार एका पोलिसासह दोन जखमी

पोलिसांनी जामिया मशिदीविरुद्ध कारवाई केल्याच्या निषेधार्थ फुटीर गटाने पुकारलेल्या बंददरम्यान शनिवारी शहरात हिंसाचाराचा उद्रेक झाला. या वेळी झालेल्या दगडफेकीत एक युवक आणि एक पोलीस जखमी

| June 28, 2015 05:18 am

पोलिसांनी जामिया मशिदीविरुद्ध कारवाई केल्याच्या निषेधार्थ फुटीर गटाने पुकारलेल्या बंददरम्यान शनिवारी शहरात हिंसाचाराचा उद्रेक झाला. या वेळी झालेल्या दगडफेकीत एक युवक आणि एक पोलीस जखमी झाले. शहरातील लाल चौक परिसरात मैसुमा येथे सुरक्षा रक्षक आणि युवकांच्या एका गटात चकमक उडाली. त्यामध्ये हेडकॉन्स्टेबल बन्सीलाल जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जामिया मशिदीजवळ २० ते २५ युवकांच्या एका गटाने सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राजौरी आणि कडाल चौक आणि सराफ काडल चौक येथे हिंसक घटना घडल्या. त्यामध्ये साहील अहमद हा २५ वर्षांचा युवक जखमी झाला. निदर्शनांदरम्यान काही युवकांनी राजौरी येथे वादग्रस्त झेंडे फडकाविले.

टय़ुनिशियातील मृतांमध्ये ब्रिटिश, बेल्जियन व जर्मन नागरिक
टय़ुनिस : टय़ुनिशियातील बीच रिसॉर्टमध्ये एका कट्टर इस्लामी बंदूकधाऱ्याने ठार केलेल्या ३८ जणांमधील ज्यांची ओळख पटली आहे, त्यात ८ ब्रिटिश, एक बेल्जियन आणि एका जर्मन नागरिकाचा समावेश आहे. अडतीसपैकी १० मृतदेहांची ओळख पटली असून त्यात ८ ब्रिटिश आणि प्रत्येकी एक बेल्जियन व जर्मन नागरिक असल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय ब्रिटिश, जर्मन व बेल्जियन नागरिकांसह इतर ३९ जण जखमी झाले आहेत. इतर मृत व्यक्ती हल्ल्याच्या वेळी केवळ ‘बीचविअर’ घालून असल्याने त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची ओळखपत्रे नसल्यामुळे त्यांची ओळख पटण्यास वेळ लागेल, असेही अधिकारी म्हणाला. पोर्ट अल कंटुई येथे शुक्रवारी एका हल्लेखोराने किनाऱ्यावरील छत्रीतून काढलेल्या बंदुकीने किनाऱ्यावरील, तसेच लोकप्रिय मेडिटेरिनिअन रिसॉर्टमधील हॉटेल पूलमधील पर्यटकांवर गोळीबार केला.

इराणतर्फे दहशतवादी हल्ल्यांचा निषेध
तेहरान : इस्लामी जिहादी गटांनी टय़ुनिशिया, कुवेत व फ्रान्समध्ये केलेले हल्ले इस्लामच्या शिकवणुकीच्या विरुद्ध आहेत, असे सांगून इराणने या हल्ल्यांचा निषेध केला आहे. या तिन्ही देशांमधील हल्ले वरवर पाहता समन्वयाने केले गेले नव्हते, मात्र इस्लामिक स्टेट गटाने इराक व सीरियातील त्यांच्या ‘खिलाफत’च्या पहिल्या वर्धापन दिनाच्या काही दिवस आधी टय़ुनिशिया व कुवेतमध्ये अत्याचारांचा दावा केला होता. ‘ही दहशतवादी कृत्ये इस्लामच्या शिकवणुकीविरुद्ध आहेत’, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मरझीह अफ्खाम म्हणाल्या. इस्लामची प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आल्याचे सांगून, मुस्लीम जगताची प्रतिमा व एकता यांना धक्का पोहोचवणाऱ्या दहशतवाती कृत्यांविरुद्ध परिणामकारक उपाय करण्याचे आवाहन त्यांनी मुस्लीम सरकारांना केले. इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद शरीफ यांनीही २६ जणांचा बळी घेणाऱ्या कुवेतमधील शियापंथीयांच्या मशिदीवरील हल्ल्याचा निषेध केला. अशी कृत्ये हा या भागातील देशांना मोठा धोका असल्याचे त्यांनी कुवेती परराषट्रमंत्र्यांशी फोनवर संपर्क साधून सांगितले.

दोन तस्करांना अटक; सहा कोटींचे चंदन पकडले
कडाप्पा (आंध्र प्रदेश) : कडाप्पा जिल्ह्य़ातून पोलिसांनी चंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून चंदानाचे १२६ ओंडके जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सहा कोटी रुपये इतकी आहे. बी. व्यंकटरमण (३८) आणि टी. बाबू (३७) अशी या तस्करांची नावे आहेत पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून पोलिसांनी त्यांना अटक केली. सदर दोघे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय तस्करीशी संबंधित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 5:18 am

Web Title: srinagar police injured in clash
Next Stories
1 मन की बातः पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यांवर मौन कायम
2 रशियाचे माजी पंतप्रधान प्रिमाकोव यांचे निधन
3 लालू ,नितीशकुमार ‘जेपीं’च्या वारशापासून दूर- पास्वान
Just Now!
X