श्रीनगरमध्ये काल शुक्रवारी केंद्रीय राखीव दलाच्या गाडीखाली आलेला २१ वर्षांचा तरूण आज मरण पावला आहे. कैसर अहमद असे या तरूणाचे नाव असून त्याच्यावर शेर ए कश्मिर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू होते. आंदोलनकर्त्या जमावामध्ये सीआरपीएफची गाडी घुसल्यानं काहीजण गाडीखाली आले, त्यामध्ये कैसरही होता. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले परंतु तिथं त्याचा आज मृत्यू झाला आहे.

शुक्रवारच्या नमाजाच्यावेळी श्रीनगरमधल्या काही बागांमध्ये तणावाचे वातावरण होते, हा तणाव निवळावा यासाठी शांतता राखण्याचे काम सुरक्षा यंत्रणा करत होत्या. परंतु पोलिसांच्या गाडीनं चुकीचं वळण घेतलं आणि ही गाडी जमावामध्ये घुसली, ज्यामुळे अनेक आंदोलनकर्ते गाडीखाली आले असे पोलिसांनी सांगितले.

या दुर्घटनेसाठी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. शस्त्रसंधी याचा अर्थ बंदुकांचा वापर करायचा नाही त्याऐवजी जीपखाली चिरडायचं असा शेरा त्यांनी ट्विटरवर मारला आहे. याआधी त्यांनी तरूणांना जीपला बांधून त्यांची गावातून धिंड काढली. आता ते आंदोलकांवरून जीप नेतात असं ओमरनी म्हटलं आहे.

सुमारे २०० जणांच्या संख्येनं आंदोलक राज्य सरकारविरोधात व केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत होते. रमजानच्या महिन्यामध्ये सरकारने शांतता रहावी असे आवाहन करताना सरकारी सुरक्षा यंत्रणा शस्त्र चालवणार नाहीत असे सांगण्यात आले होते.