कन्सासमधील भारतीयाच्या खून प्रकरणी

कन्सास सिटी बारमध्ये भारतीय तंत्रज्ञ श्रीनिवास कुचीभोटला याला बाचाबाचीत ठार केल्याच्या प्रकरणी नौदलाचा माजी अधिकारी अॅडम प्युरिटन याच्यावर वर्णविद्वेष व शस्त्रे बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी इतर दोन जण जखमी झाले होते. कन्सासमधील ओलाथचा रहिवासी असलेल्या प्युरिटन याच्यावर संघराज्य न्यायालयाने २२ फेब्रुवारीच्या गोळीबाराच्या घटनेत आरोप निश्चित केले आहेत. न्याय खात्याने आरोपी प्युरिंटन याच्यावर कुचीभोटला याचा खून व अलोक मदासानी याला मारण्याचा प्रयत्न अशा मुद्दय़ांवर द्वेषमूलकता, वर्णविद्वेष, धर्मविद्वेष असे आरोप ठेवले आहेत.

साक्षीदारांनी सांगितले, की प्युरींटन हा दोन भारतीयांवर तुम्ही माझ्या देशातून चालते व्हा असे ओरडला होता व नंतर हल्ला केला होता. इयान ग्रिलॉट या अमेरिकी तरुणाने यात हस्तक्षेप केला असता तोही जखमी झाला होता. हंगामी सहायक महाधिवक्ता थॉमस इ व्हीलर व कन्सासचे अधिवक्ता थॉमस बिऑल यांनी दोषारोपपत्र सादर केले. प्युरिंटन याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

न्याय खाते याबाबत कुठली शिक्षा देण्याचा युक्तिवाद करायचा हे ठरवणार आहे. संघराज्य कायद्यानुसार कुचीभोटला, मदासानी व ग्रिलॉट यांच्यावर बंदूक चालवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला आहे. एकाच वेळी अनेक जणांना ठार करण्याचा त्याचा प्रयत्न होता. प्युरिंटन सध्या जॉन्सन तुरुंगात असून त्याने खूनप्रकरणी २० लाख डॉलर्सचे हमीपत्र दिले आहे.