अभिनेता शाहरूख खानचे सासरे कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांचे मंगळवारी रात्री दिल्लीमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल कळताच शाहरूख खान पत्नी गौरीसह लगेचच मुंबईतून दिल्लीकडे रवाना झाला. छिब्बर यांच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्नल छिब्बर यांना मंगळवारी रात्री त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी शाहरूख खान, अभिनेता-दिग्दर्शक करण जोहर, गौरी आणि तिचा भाऊ विक्रांत यांच्यासह इतर नातेवाईक उपस्थित होते.
करण जोहर याने ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, होशियारपूर जिल्ह्यातील पट्टी गावातून १९७० मध्ये कर्नल छिब्बर दिल्लीमध्ये आले. त्यांचे सविता छिब्बर यांच्याशी लग्न झाल्यावर त्यांना दोन मुले झाली. त्यापैकी एक गौरी आणि दुसरा विक्रांत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.