न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरातील एका सुपर मार्केटमध्ये एका व्यक्तीने चाकू हल्ला केला होता. हा हल्ला करणारा आयसिसचा दहशतवादी असल्याचं पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी जाहीर केलंय. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. या व्यक्तीने हल्ला सुरू केल्यानंतर त्याला अवघ्या ६० सेकंदातच ठार मारण्यात आले, असे आर्डर्न यांनी शुक्रवारी सांगितले.

“हा हल्ला द्वेषपूर्ण आणि चुकीचा होता. हा हल्लेखोर श्रीलंकन नागरिक होता आणि तो २०११ मध्ये न्यूझीलंडमध्ये आला होता. या हल्ल्याची जबाबदारी त्याची एकट्याची आहे. हल्लेखोराबाबत मी सार्वजनिकरित्या जास्त माहिती देऊ शकत नाही. मात्र, त्याच्यावर संशय असल्याने २०१६पासून त्याच्यावर पाळत ठेवण्यात येत होती,” असेही ऑर्डर्न म्हणाल्या. तर, “हल्लेखोर हा एकटाच होता आणि त्याला ठार मारल्यानंतर बाकी लोकांना कोणताच धोका नाही,” असं पोलीस आयुक्त अँड्र्यू कॉस्टर यांनी सांगितलं.

जखमी झालेल्या सहा जणांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. तर एकाची प्रकृती स्थिर आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, त्यांनी काही लोकांना चाकूने भोसकलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहिले. तर, काहींनी सुपरमार्केटच्या बाहेर पळत असताना गोळीबाराचा आवाज ऐकल्याचं म्हटलंय.