लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पार पडून निकाल लागण्याआधीच द्रमुक नेता एमके स्टॅलिन यांनी केंद्रातील तिसऱ्या आघाडीची शक्यता नाकारली आहे. आपल्याला केंद्रात तिसऱ्या आघाडीची कोणतीही शक्यता दिसत नाही. मात्र, सर्व काही २३ मे रोजी निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल.

तेलंगणाचे मुख्यमंत्री व टीआरएस प्रमुख केसीआर यांच्याबरोबर मंगळवारी स्टॅलिन यांची बैठक पार पडल्यानंतर, त्यांना केंद्रातील संभाव्य तिसऱ्या आघाडीबाबत विचारणा करण्यात आली होती. तसेच, या बैठकीमागील कारणही विचारले गेले. यावर स्टॅलिन यांनी केसीआर यांचा हा तामिळनाडू दौरा सरकार स्थापनेच्या कामासाठी नव्हता, तर ते येथील मंदिरांना भेट देण्यासाठी आले होते, आमची केवळ औपचारीक भेट होती.असे सांगितले.द्रमुक तामिळनाडूत काँग्रेस महाआघाडीबरोबर मिळून भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करत लोकसभा लढवत आहे.

भाजपा आणि कॉंग्रेसपासून दूर राहिलेल्या क्षेत्रीय पक्षांच्या केंद्रातील तिसऱ्या आघाडीसाठी राव यांनी पुढाकार घेतला होता. आता भाजपला बहुमत मिळणार नाही या आशेवर त्यांनी पुन्हा हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांनी मागील आठवड्यातच केरळचे मुख्यमंत्री व सीपीआय(एम) नेते पिनरायी विजयन यांची थिरुवनंतपुरम येथे भेट घेतली होती.