नववर्षोत्सव साजरा करण्यासाठी शांघायमध्ये मोठय़ा प्रमाणावर लोक जमले असताना चेंगराचेंगरी झाल्याने ३६ जणांचा मृत्यू झाला, तर ४८ जण जखमी झाले. नववर्षांनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमस्थळी एका इमारतीतून पडलेले कागदाचे तुकडे डॉलरच्या नोटा असल्याचे समजून ते गोळा करण्यासाठी अनेक जण धावले आणि ही दुर्घटना घडली.
शहरातील नदीकिनारी असलेल्या पर्यटनस्थळी नववर्षांनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमस्थळी लोकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. त्याच वेळी जवळच असलेल्या एका इमारतीच्या खिडकीतून कागदाचे काही तुकडे खाली पडले. त्या डॉलरच्या नोटा असल्याचे समजून नदीकिनारी उभे असलेले लोक त्या गोळा करण्यासाठी धावले. ते कागदाचे तुकडे १०० डॉलरच्या नोटेसारखे भासत असले तरी त्या बनावट नोटा होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या ३६ जणांपैकी २५ महिला आहेत. जखमी झालेल्या ४८ जणांपैकी बहुतेकांचा अस्थिभंग झाला असून, १४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी झालेल्या अनेक महिला विशीतल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शि जिनपिंग यांचे चौकशीचे आदेश
चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी या प्रकरणाची जलदगतीने चौकशी व्हावी, असे आदेश दिले आहेत. मोठय़ा प्रमाणात गर्दी करणाऱ्या अशा कार्यक्रमांवर बंदी घातली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दुर्घटनेतील जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.