बालाकोट हवाई हल्ल्यानंतर सरकारने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे एकूण ४० सुखोई लढाऊ जेट विमानांवर बसवण्याचा निर्णय घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड व ब्राह्मोस एरोस्पेस लिमिटेड या दोन कंपन्यांना याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२० पर्यंत सुखोई लढाऊ विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे बसवण्यात येतील असे सांगण्यात आले.

प्रत्यक्षात ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची हवाई आवृत्ती सुखोई विमानांवर बसवण्याचे सरकारने २०१६ मध्ये ठरवले होते. प्रत्यक्षात ते काम २०१७ च्या अखेरीस सुरूही झाले, पण त्याची गती फार मंद होती त्यामुळे आता हे काम वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे हवाई हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसून हवाई हल्ल्यांचा प्रयत्न केला, त्यानंतर सुखोई विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे लावण्याचे काम वेगाने सुरू करण्याची आवश्यकता प्रतिपादन करण्यात आली.

पाकिस्तानी हवाई दलाला सडेतोड उत्तर देण्यासाठी मिटीऑर क्षेपणास्त्रांसह राफेल विमानांची खरेदी,  एस ४०० हवाई संरक्षण प्रणालीची खरेदी व सुखोईवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे लावणे या तीन गोष्टींवर भर देण्यात येत आहे. २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने काश्मीरमध्ये हवाई हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न केला होता, पण अशा परिस्थितीत भारताची हवाई दल क्षमता जास्त असती तर त्यांना जास्त हानी पोहोचवता आली असती. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या हवाई आवृत्तीची चाचणी २२ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात आली होती, त्या वेळी सुखोई ३० विमानावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते.