लोकसभेत भाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पुन्हा एकदा आता राम मंदिराची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राम मंदिराच्या उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. स्वामी यांनी रविवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. तसेच रामजन्मभूमीच्या कायदेशीर बाबींबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

सरकारच्या कायदेशीर सल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक नाही. तसेच तत्कालिन पंतप्रधान नरसिंम्हा राव यांनी त्या जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले होते आणि 300 A या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालय यावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ते केवळ भरपाई ठरवू शकतात. त्यामुळे मंदिर उभारणीचे काम त्वरित सुरू करण्यासाठी कोणतीही बाधा नसल्याचे आपण पत्रात नमूद केले असल्याचे स्वामी यांनी ट्विटरवरून सांगितले.

याव्यतिरिक्त स्वामी यांनी रामसेतूला प्राचीन स्मारकाला राष्ट्रीय पौराणिक स्मारक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणीदेखील केली आहे. त्यांनी यावेळी मद्रास उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला पाठवण्यात आलेल्या नोटीसचा उल्लेख केला आहे. यामध्ये न्यायालयाने सरकारला रामसेतूला राष्ट्रीय पौराणिक स्मारक का घोषित करण्यात येऊ नये, असा सवाल केला होता. दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयाकडून याला मान्यता देण्यात आली असली तरी मंत्रिमंडळाने याला का मान्यता दिली नाही, असा सवालही स्वामी यांनी केला आहे.