देशात प्रत्येक तहसील पातळीवर युरिन बँक स्थापन करण्याचा सल्ला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. प्रत्येक तहसील पातळीवर युरिन बँक स्थापन करून त्यापासून युरिया तयार केला पाहिजे. उर्वरक म्हणून वापर करण्यासाठी ते शेतकऱ्यांना दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. मला वाटतं यामुळे युरियाची आयात कमी होईल, असेही ते म्हणाले.

ही कल्पना अजून प्राथमिक स्तरावर आहे. स्वीडनच्या काही शास्त्रज्ञांच्या साथीने हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे गडकरी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले. मनुष्याच्या मूत्रांत मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असते. परंतु, ते वाया जाते. टाकाऊपासून संपत्तीत रूपांतर करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नरत असतो. मला वाटतं की या कल्पनेवर काम केल्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. आपल्याकडे आधीपासूनच फॉस्फरस आणि पोटॅशियमचा सेंद्रिय पर्याय उपलब्ध आहे. जर आपण याची नायट्रोजनशी सांगड घातली तर यामुळे पिकांच्या विकासासाठी योग्य घटक मिळतील, असेही ते म्हणाले.

जर या योजनेवर काम झालं तर शेतकऱ्यांनी १० लीटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये युरिन गोळा करावे आणि ते तहसील स्तरावर असलेल्या केंद्रात जाऊन द्यावे लागेल, असे ते म्हणाले. अशाप्रकारचे प्लास्टिक कॅन सरकारकडून पुरवण्यात येतील. प्रति लिटर युरिनसाठी शेतकऱ्यांना एक रूपया मिळेल. ही चाचणी ग्रामीण भागातून सुरू करता येईल. त्यानंतर एकत्र केलेले युरिन डिस्टिल करून शुद्ध केले जाईल म्हणजे यामुळे सेंद्रिय खत उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.