पंतप्रधानांकडून विविध खात्यांच्या कामांचा आढावा

देशातील वीज पुरवठा नसलेल्या १८ हजार ५०० खेडय़ांपैकी सहा हजार खेडय़ात वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकाऱ्यांनी दिली. अपारंपरिक ऊर्जानिर्मिती ३९.५ गिगॅवॉट असल्याचेही सांगण्यात आले. सुमारे अडीच तास पंतप्रधानांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी पायाभूत क्षेत्रातील कामगिरीचे सादरीकरण केले. सर्वाना घर योजनेचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. स्थानिक बांधकाम साहित्य व आधुनिक तंत्रज्ञान यांच्या मदतीने घरे वेगाने बांधावीत असे आदेश मोदी यांनी संबंधितांना दिले आहेत.

ऊर्जा, कोळसा, गृहनिर्माण व डिजिटल इंडिया या योजनांचाही आढावा घेण्यात आला. डाव्या नक्षलवादी चळवळीचा फटका बसलेल्या खेडय़ांमध्ये १३७१ मोबाईल टॉवर्स बसवण्यात आले आहेत. खेडय़ांना वीज पुरवठा करण्यात प्रगती होत असून १८ हजार ५०० खेडय़ांच्या उद्दिष्टातील सहा हजार खेडय़ांचे विद्युतीकरण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांना असे सांगण्यात आले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्यात जिओ टॅगिंगचा समावेश आहे. पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या संदर्भात मोदी यांना अशी माहिती देण्यात आली की, एकूण उद्दिष्ट १७५ गिगॅव्ॉटचे असून ते २०२२ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सध्या ३९.५ गिगॅव्ॉट ऊर्जेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अधिकाऱ्यांनी अरुणाचल प्रदेश सारख्या भागात सोलर पॅनेल किंवा इतर मार्गानी वीज पोहोचवण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे. एलईडी दिवे पुरवण्याचाही आढावा घेण्यात आला. कोल इंडिया लिमिटेड कंपनीने या वर्षी ९.२ टक्के उत्पादन वाढीचे उद्दिष्ट गाठले असून गेल्या पाच वर्षांत सरासरी वाढ केवळ ३ टक्के होती. ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशा सूचना मोदी यांनी दिल्या. बारा पर्यटन ठिकाणांना सार्वजनिक वायफाय सुविधा दिली असल्याचे पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदर क्षेत्राचा आढावा घेण्यात आला असता पंतप्रधानांनी महत्त्वाच्या बंदरांवर आंतरराष्ट्रीय मानके लागू करण्यास सांगितले.