देशात करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच बँका ट्रान्झॅक्शनसाठी आणि अन्य सेवांच्या वापरासाठी डिजिटल सेवांचा वापर करण्यास सांगत आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेपर्यंत जावं लागणार नाही. या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेनं ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकांना घरबसल्या आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि अखेरच्या पाच ट्रान्झॅक्शनची माहिती घेता येणार आहे. बँकेनं यासाठी आयव्हीआर (IVR) सेवा सुरू केली आहे.

कसा कराल वापर ?

सर्वप्रथम ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्रांच्या १८००-४२५-३८०० किंवा १८००-११-२२११ या क्रमांकावर फोन करावा लागेल.

यानंतर तुमची भाषा निवडा.

त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड बेस्ड क्रमांकाच्या सेवेसाठी १ डायल करा.

त्यानंतर अखेरच्या पाच ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा १ दाबा.

त्यानंतर आयव्हीआरच्या माध्यमातून माहिती घेण्यासाठी १ दाबा किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी २ दाबा.

या सुविधा केवळ एकच व्यक्ती हाताळत असलेल्या बचत खाते धारकांसाठी आहे. तसंच यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक एकाच

खातेधारकाच्या नावावर रजिस्टर असणं अनिवार्य आहे.

घरपोच पैशांची सुविधा
तब्बल ४० कोटीं ग्राहक असणारी स्टेट बँक डोरस्टेप डिलव्हरी या सुविधेअंतर्गत घरपोच पैसे आणि घरीच पैसे जमा करण्याची सुविधा देत आहे. एसबीआयची ही सुविधा फक्त ज्येष्ट नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांसाठी आहे. या सुविधेचं शुल्क १०० रुपये आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक एचडीएफसीही ग्राहकांना घरपोच पैशांची सेवा देत असून पाच हजार रूपयांपासून २५ हजारांपर्यतची रोकड ग्राहक घरपोच मागवू शकतात. त्यासाठी १०० रूपयांपासून २०० रुपयांपर्यतच शुल्क संबंधित बँकेकडून आकारलं जातं. कोटक, एक्सिस आणि इतर बँकमार्फतही अशाच नियमांनुसार घरपोच पैशांची सेवा दिली जाते. संबधित बँकेचं संकेतस्थळ किंवा अॅपवर या सुविधेची सर्व माहिती उपलब्ध आहे.