खात्यात किमान रक्कम नसल्यास स्टेट बँकेचा दंड

देशातील बडय़ा खासगी बँकांनी रोखीच्या निशुल्क व्यवहारांवर बंधने आणल्याने सर्वसामान्यांत नाराजी व्यक्त होत असताना, सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँकेनेही त्यांचाच कित्ता गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, बचत खात्यात किमान आवश्यक रक्कम नसल्यास खातेदारांना दंड करण्याचेही बँकेने ठरवले आहे.

अधिकाधिक ग्राहक आकर्षित व्हावेत, यासाठी खात्यातील किमान रकमेबाबतचा नियम स्टेट बँकेने पाच वर्षांपूर्वी मागे घेतला होता; तो नियम येत्या १ एप्रिलपासून पुन्हा लागू होणार आहे, असे बँकेने रविवारी जाहीर केले. त्यानुसार, महानगरांमध्ये स्टेट बँकेच्या बचत खात्यात ग्राहकाचे किमान पाच हजार रुपये असणे आवश्यक असेल. किमान आवश्यक रकमेचा आकडा महानगर, शहर, गाव, खेडे यांसाठी वेगवेगळा असेल. या रकमेच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम खात्यात असल्यास १०० रुपये अधिक सेवाकर, ५० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम खात्यात असल्यास ५० रुपये अधिक सेवाकर असा दंड आकारला जाईल. ग्रामीण भागात हा दंड कमी असेल.

स्टेट बँकेच्या खात्यातून महिन्याला रोखीचे तीन व्यवहार निशुल्क असतील. त्यापुढील प्रत्येक व्यवहारासाठी ५० रुपये व सेवाकर इतके शुल्क लागू असेल. स्टेट बँकेच्या खातेदारास स्टेट बँकेच्याच एटीएममधून पाचवेळा पैसे काढणे निशुल्क असेल. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास प्रत्येक वेळी १० रुपये शुल्क पडेल. स्टेट बँकेच्या खातेदाराने इतर बँकेच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढल्यास त्यावर कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र पुढे त्यासाठी २० रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागेल. मात्र, स्टेट बँकेच्या खातेदाराच्या खात्यात २५ हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा असल्यास एटीएमद्वारे पैसे काढण्यावर कुठलेही शुल्क लावले जाणार नाही.