स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये आता रांग लावण्याची आवश्यकता नाही. छोट्या कामांसाठी मोठमोठ्या रांगा लावण्याची गरज आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना भासणार नाही. स्टेट बँकेकडून ई-टोकन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक नो क्यू (No Queue) या अॅपवरुन ई-टोकन घेऊ शकतात.

अँड्रॉईड स्मार्टफोन धारक गुगल प्ले स्टोरवरुन आणि अॅपल फोन धारक अॅपल स्टोरवरुन नो क्यू (No Queue) अॅप डाऊनलोड करु शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहक ई-टोकन घेऊन बँकेच्या निवडक शाखांमध्ये काही सेवांचा लाभ घेऊ शकतात. ई-टोकन असलेले ग्राहक त्यांना देण्यात आलेल्या क्रमांकानुसार काऊंटरवर जाऊन सेवा प्राप्त करु शकतात. यासाठी ग्राहकांना रांग लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

एसबीआयच्या या नव्या अॅपचे लॉन्चिंग बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मागील वर्षी केले होते. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे पेमेंट करावे लागणार नाही. हे अॅप पूर्णपणे मोफत आहे. ‘ग्राहकांचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी या अॅपची सुरुवात करण्यात आली आहे. या अॅपमुळे ग्राहकांना कमीतकमी वेळात आवश्यक ती सेवा मिळेल,’ असे स्टेट बँक ऑफ इंडियाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ई-टोकनच्या माध्यमातून ग्राहकांना अॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाच सेवा निवडू शकतात. कॅश डिपॉजीट, कॅश विड्रॉवल, चेक डिपॉजीट, डिमांड ड्राफ्ट, एनईएफटी/आरटीजीएस यासारख्या सेवांसाठी ग्राहक अॅपच्या माध्यमातून ई-टोकन घेऊ शकतात. ‘बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांबद्दलचे रिअल टाईम स्टेटस’ नो क्यू अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना समजेल. त्यामुळे ग्राहकांना घरी असताना किंवा ऑफिसला असताना बँकेतील काऊंटरवरील रांगेत नेमके किती लोक आहेत, याची माहिती मिळेल. त्यामुळे रांगेत फारशी गर्दी असताना ग्राहकांना बँकेत जाऊन त्यांचे काम कमी वेळात करता येईल.