देशात वाढत्या मॉब लिंचिंगच्या अर्थात जमावाकडून मारहाणीच्या घटनांबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. संविधानातील सातव्या अनुसूचीनुसार, पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असल्याचे या घटनांची जबाबदारी ही संबंधीत राज्यांची असल्याचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे.


देशभरात गेल्या सहा महिन्यांत जमावाकडून मारहाणीच्या घटनांध्ये वाढ झाली आहे, याबाबत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राय म्हणाले, अशा घटनांना संबंधीत राज्य सरकार जबाबदार आहे. अशा घटनांना आळा घालणे, आरोपींना अटक करणे आणि अशा गुन्ह्यांची चौकशी करणे तसेच संबंधीत राज्यांच्या कायद्यांप्रमाणे दोषींना शिक्षा करणे ही राज्यांची जबाबदारी आहे.


देशातल्या अशा जमावाकडून मारहाणीच्या घटनांची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) नोंदवली नसल्याचेही नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले.