पूंछमधील हल्ल्यासंदर्भात मंगळवारी संसदेत केलेले निवेदन हे त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार केले होते. लष्करप्रमुख विक्रमसिंग हे घटनास्थळी गेले असून, ते परत आल्यानंतर माहिती घेऊन आवश्यक असल्यास नव्याने निवेदन केले जाईल, अशी माहिती संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटनी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. 
पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर अ‍ॅंटनी यांनी संसदेमध्ये केलेले निवेदन आणि त्यापूर्वी भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तफावत आहे, याकडे व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. संरक्षणमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली होती. त्यावर बोलताना अ‍ॅंटनी यांनी संसदेमध्ये काल केलेले निवेदन हे त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आले होते. लष्करप्रमुख घटनास्थळी गेले असून, ते परत आल्यावर त्यांच्याकडून माहिती घेऊन आवश्यक असल्यास नव्याने निवेदन करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले. संरक्षणमंत्र्यांच्या उत्तरानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. सरकार एकाच दिवसामध्ये दोन वेगवेगळी निवेदने कसे काय देऊ शकते, असा प्रश्न व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजपर्यंत तहकूब करण्यात आले.