करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारे सुसज्ज नसतील तर डिसेंबरमध्ये परिस्थिती आणखी वाईट होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी पूर्णत: तयारी केली पाहिजे, अशी समज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिली.

तसेच दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या चार राज्यांत झपाटय़ाने वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येचीही दखल न्यायालयाने घेतली. या राज्य सरकारांना दोन दिवसांत करोना परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या राज्यांमधील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य प्रशासनाकडून नेमके कोणते उपाय केले जात आहेत, याचा सविस्तर तपशील न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

या महिन्यात (नोव्हेंबर) करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे. सर्व राज्यांतील परिस्थितीचा अहवाल सादर केला जावा, राज्ये करोना रोखण्यास सुसज्ज नसतील तर डिसेंबरमध्ये परिस्थिती आणखी बिघडेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यासंदर्भातील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

न्यायालयाने दिल्लीत परिस्थितीबाबतही विचारणा केली. दिल्लीतील सद्य:स्थिती काय आहे, कोणते अतिरिक्त उपाय केले गेले, याची माहिती दिली जावी. न्यायालय त्याचा आढावा घेईल, असे न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्लीतील परिस्थितीची माहिती न्यायालयाला दिली. केंद्र सरकारकडून घेतल्या गेलेल्या धोरणात्मक निर्णयाचीही माहिती देण्यात आली. लग्न समारंभ, मिरवणुका काढण्याची परवानगी देण्याच्या गुजरात सरकारच्या धोरणावरही न्यायालयाने ताशेरे ओढले.

विविध राज्यांत बिघडलेल्या करोनाच्या परिस्थितीची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत २ जुलै रोजी सुनावणी घेतली होती व केंद्र व राज्य सरकारांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र २७ जुलैपर्यंत अनेक राज्यांनी न्यायालयाला अहवाल सादर केले नव्हते. स्थलांतरित मजुरांच्या मुद्दय़ावरही महाराष्ट्रासह अन्य राज्यांकडून सर्वोच्च न्यायालयाने अहवाल मागितला होता.

रुग्णवाढ किंचित कमी

गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ४४ हजार ५९ नव्या करोना रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ९१ लाखांपेक्षा जास्त (९१.३९ लाख) झाली आहे. त्या तुलनेत रविवारी दिवसभरात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेत कमी (४१ हजार २४) होती. गेल्या चोवीस तासांमध्ये मृत्यूचा आकडाही ५११ वर पोहोचला. ४.४३ लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. शनिवारी दिवसभरात ४५ हजार २०९ रुग्ण वाढले होते, त्या तुलनेत गेल्या चोवीस तासांतील वाढ किंचित कमी असल्याचे आढळले आहे. गेल्या आठवडय़ातच केंद्राने राज्यांना नमुना चाचण्या वाढवण्याचा आदेश दिला होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ८.५ लाख चाचण्या करण्यात आल्या असून संसर्गदर ५.१ टक्के होता.