महिलांवरील वाढत्या अ‍ॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेत तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राज्यांनी अ‍ॅसिडच्या किरकोळ विक्रीवर तातडीने बंदी घालावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
अ‍ॅसिडची खरेदी करणाऱ्या व्यक्तीची योग्य नोंद न ठेवणाऱ्या अ‍ॅसिड विक्रेत्यावर कारवाई करून त्याला ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठवावा, अशी सूचना मंत्रालयाने राज्यांना केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्यांनी बेकायदेशीर अ‍ॅसिड व्यापार हा अजामीपात्र गुन्हा व्हावा म्हणून त्वरित कायदा करावा,असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय शैक्षणिक संस्था, संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा, रुग्णालय, सरकारी विभाग आदींनी आपल्याकडील अ‍ॅसिड वा रसायनांच्या साठय़ाची योग्य ती नोंद ठेवून सरकारदरबारी त्याची माहिती द्यावी, अशी सूचनाही गृहमंत्रालयाने केली आहे.