सोशल मीडियावरील वाढत्या टीकेमुळे उत्तराखंड सरकारवर शक्तिमान या घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजप आमदाराच्या अमानुष मारहाणीत शक्तिमानचा मृत्यू झाला होता. त्याच्या स्मरणार्थ देहरादून येथे शक्तिमानची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. मात्र, शक्तिमानला अशाप्रकारे अवाजवी प्रसिद्ध दिल्याच्या कारणावरून सरकारवर सोशल मीडियावरून टीका सुरू होती. काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्यापेक्षा शक्तिमानला अधिक महत्त्व देण्यात येत असल्याचा आक्षेप नेटिझन्सकडून घेण्यात येत होता. त्यामुळे शक्तिमानचा पुतळा रातोरात हटविण्यात आला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत शक्तिमानचा पुतळा उभारण्यात आलेल्या पार्कचे उद्घाटन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा पुतळा हटविण्याची वेळ सरकारवर आली आहे. दरम्यान, आता पुतळा हटविल्यामुळे पुन्हा नव्याने टीकेला सुरूवात झाली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी फंडाचा गैरवापर केल्याचा आरोप करत गणेश जोशी या आमदाराने समर्थकांसह आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी घोडयावरुन आलेल्या पोलिसांवर जोशी व त्याच्या समर्थकांनी हल्ला चढवला होता. त्याचवेळी जोशींनी शक्तीमान घोड्यावरही हल्ला केला. त्यांनी सुरवातीला घोड्याच्या तोंडावर दांडुका मारला, त्यांनतर त्याच्या पायावर प्रहार केल्याने शक्तिमान खाली कोसळला. गणेश जोशींनी केलेल्या अमानुष मारहाणीत शक्तिमानला आपला पाय गमवावा लागला होता. शक्तिमान १४ मार्च रोजी जखमी झाल्यावर त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्याला कृत्रिम पायही बसविण्यात आला होता. मात्र, तो या दुखापतीतून पूर्ण सावरू शकला नाही आणि अखेर त्याची ही झुंज २० एप्रिलला संपली. तेरा वर्षीय ‘शक्तिमान’ उत्तराखंड पोलीस दलातील प्रशिक्षित अश्व होता. शक्तिमान शूर योद्धा होता आणि कर्तव्य बजावत असतानाच त्याच्यावर भ्याड हल्ला झालेला. शक्तिमानवर झालेल्या या भ्याड हल्ल्यावर अभिनेत्री आलिया भट, अनुष्का शर्मासह इतर बॉलिवूड अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली यानेही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.