गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी'(१८२ मीटर उंच) पाहण्यासाठी आलेले बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी लिफ्टमध्ये काही वेळ अडकले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या हृदयस्थळाजवळ साधारण १५३ मीटर उंचीवर स्थापन व्ह्युइंग गॅलरीत जाण्यासाठी सुशील मोदी गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल आणि काही अधिकाऱ्यांबरोबर गेले तेव्हा अचानक लिफ्ट बंद पडली. त्यामुळे ते मिनिटभर अडकून पडले होते. जास्तीच्या वजनामुळे लिफ्ट काही वेळ अडकल्याचे सांगण्यात येते.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळावर गुजरात मेरिटाइम मंडळाचे उपाध्यक्ष आणि सीईओ मुकेश कुमार हेही उपस्थित होते. जास्तीच्या वजनामुळे ही घटना घडल्याचे मुकेश कुमार यांनी सांगितले. लिफ्टमधील काही लोक बाहेर काढल्यानंतर ती पुन्हा सुरु झाली. केवळ एक मिनिट ही अडचण निर्माण झाली होती, असे ते म्हणाले.

या पुतळ्याच्या व्ह्युइंग गॅलरीजवळ पर्वत व साधारण ३ किमीपर्यंत सरदार सरोवर बंधाऱ्याचे मनोहारी दृश्य पाहता येते. तिथे जाण्यासाठी दोन लिफ्ट आहेत, तसेच पर्यटकांमध्ये हे दृश्य लोकप्रिय आहे. यावर जाण्यासाठी प्रतिव्यक्ती ३५० रुपये व मुलांसाठी २०० रुपये तिकीट घ्यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑक्टोबरला याचे लोकार्पण केले होते.