अजब. अतक्र्य. आणि केवळ गोष्टींमध्येच वाचायला मिळावी, अशी घटना घडली आहे. येथील मँचेस्टर वस्तूसंग्रहालयामध्ये असलेला ४ हजार वर्षे जुना इजिप्शियन पुतळा स्वतहून हलला आणि तोसुद्धा साधासुधा नव्हे तर पूर्ण १८० अंशांमध्ये!
इसवी सन पूर्व १८०० मधील एका ममीच्या कबरीत सापडलेला हा पुतळा गेली ८० वर्षे मँचेस्टर वस्तूसंग्रहालयात वास्तव्यास आहे. १० इंच उंचीचा हा पुतळा, प्रेक्षकांकडे पाठ करून उभा असल्याचे काही जिज्ञासू पर्यटकांनी संग्रहालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. तज्ज्ञांनी या घटनेची दखल घ्यायचे ठरविले.
वेळेची नोंद असलेल्या व्हिडीओद्वारे या पुतळ्याचे निरीक्षण केले. निरीक्षणांती धक्कादायक बाब पुढे आली. एकही व्यक्ती पुतळ्याच्या जवळपास फिरकली नसताना देखील पुतळा १८० अंशात फिरला असल्याचे चित्रीकरणात दिसून आले. तो पुतळा, नेब सेनु असे नाव असलेल्या एका व्यक्तीचा असून रात्रीच्या वेळात स्थिर राहत असून दिवसा तो १८० अंशात फिरत असल्याचे आढळून आले आहे.
या वस्तूसंग्रहालयाचे कर्ते कँपबेल प्राइस यांनी याबाबत सांगितले, की एकदा मी या पुतळ्याची दिशा बदललेली पाहिली. किल्ल्या फक्त माझ्याकडेच असताना हे कसे काय घडले म्हणून माझ्या मनात कुतूहल जागृत झाले. मी पुतळा पूर्ववत करून ठेवला. पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा हलल्याचे  िदसले. म्हणून मग व्हिडीओ पाहाणी करण्याचे ठरले. प्रत्यक्ष नजरेस जरी ही हालचाल होताना दिसत नसली तरीही पुतळा १८० अंशात वळल्याचे मात्र काही छायाचित्रांमधून स्पष्ट होते, असे प्राइस यांनी सांगितले.
 पुतळा हा ममीसह कबरीतच ठेवणे परंपरेला धरून आहे, मात्र या परंपरेस छेद दिल्याने ही हालचाल होत असावी असे काही जणांनी, तर यामागे पराशक्तींचा हात असावा, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला आहे. मात्र, काही शास्त्रज्ञांनी ही हालचाल पावलांच्या हालचालींच्या धक्क्य़ांमुळे होत असेल असे अनुमान वर्तविले.