भारत आणि रशिया पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्रात सहकार्याचे धोरण अवलंबताना दिसत आहेत. गोवा येथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अब्जावधी डॉलरच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. चार युद्धनौका, पाच एस-४०० अँटी एअरक्राफ्ट आणि कामोव्ह- २२६ टी हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात संयुक्तरित्या सुरू करण्यावर सांमजस्य करार होऊ शकतो. हलक्या वजनाचे २०० हेलिकॉप्टर खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली. भारत आणि रशिया पुन्हा एकदा जवळ येत आहेत. संरक्षण क्षेत्रात आम्ही मॉस्कोबरोबर पुढे जात आहोत. अमेरिकेबरोबरही आमचे संबंध चांगले आहेत. रशियाबरोबरील मैत्रीचा अमेरिकेच्या संबंधावर काहीच परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण बनले आहे. त्याचदरम्यान पाकिस्तानच्या भूमीवर रशियाचा संयुक्त लष्करी सराव होणार असल्याचे वृत्त आले होते. परंतु रशियाच्या पाकिस्तानबरोबरील संयुक्त लष्करी सरावाचा भारताबरोबरील संबंधावर परिणाम होणार नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वीपासून भारत आणि रशियात दृढ संबंध आहेत. त्याच्यावर पाकिस्तानमुळे काहीच फरक पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅडमिरल ग्रिगोरोविच (प्रोजेक्ट ११३५६) श्रेणीच्या चारपैकी दोन युद्धनौका या रशियातून येतील तर दोन युद्धनौकांची निर्मिती भारतात केली जाईल. या युद्धनौकांच्या निर्मितीसाठी शीपयार्डची निवड करण्यात आली आहे. ३६२० टन वजनाची अॅडमिरल ग्रिगोरोविच युद्धनौकेवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात करता येईल.
भारत आणि रशियामध्ये सुमारे ४.५ अब्ज डॉलर किंमतीचे पाच एस-४०० अँटी एअरक्राफ्ट खरेदी करण्याचा आंतरराष्ट्रीय करार होणार आहे. एस-४०० क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगातील सर्वात अत्याधुनिक असल्याचे मानले जाते. सुमारे ४०० किलोमीटर अंतरावरील क्षेपणास्त्र, ड्रोन आणि फायटर जेट विमांनाचा वेध घेऊ शकते. आता चीननंतर एस-४०० अँटी एअरक्रॉफ्ट क्षेपणास्त्र खरेदी करणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे.
याशिवाय भारत रशियाकडून २०० कामोव्ह-२२६टी हलक्या वजनाच्या हेलिकॉफ्टरच्या संयुक्त उत्पादनाच्या करारावर स्वाक्षरी करू शकतो. हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशिया याचे संयुक्तरित्या उत्पादन करतील.