आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून अंतराळ संशोधनात व भौतिकशास्त्रात महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवजातीला शक्य तितक्या लवकर अंतराळात वस्ती करण्याचा इशारा दिला आहे.
हॉकिंग यांनी शनिवारी होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरून केंब्रिज येथील आपल्या कार्यालयातून ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊस येथील श्रोत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
पृथ्वीवरील वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मानवी स्वभावातील आक्रमकता आणि क्रौर्य यामुळे मानवजातीपुढील आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे पुढील १००० वर्षांत येथील वातावरण मानवजातीच्या अस्तित्वाला पोषक राहणार नाही. मानवजातीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण शेजारील ग्रहांवर आणि अंतराळात तातडीने वस्ती करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याकडे मानवजातीच्या अस्तित्वाचा विमा अशा अर्थाने पाहिले पाहिजे, असे हॉकिंग म्हणाले. आपले विश्व कसे अस्तित्वात आले, विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपली नेमकी काय भूमिका आहे, येथील घटकांचा परस्परसंबंध काय आहे, अंतराळातील विविध घटनांचा कार्यकारणभाव काय आहे, या सर्वाचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. आपले लक्ष आपल्या पायांकडे नाही तर आकाशातील ताऱ्यांवर असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सैद्धांतिक भौतिकशास्त्राविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देताना हॉकिंग यांनी सध्याच्या करमणूक क्षेत्रातील उदाहरणे देऊन श्रोत्यांशी जवळीक साधली. जगभरच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला इंग्रजी गायक झायन मलिक याने ‘वन डायरेक्शन’ हा बँड सोडून ‘द एक्स फॅक्टर’ या मालिकेत प्रवेश केल्याने लाखो तरुणींची मने दुखावली आहेत. त्याचा वैश्विक शास्त्रावर कसा परिणाम होईल, असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हॉकिंग यांनी सांगितले की, सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास असे शक्य आहे की झायन एका विश्वात अजूनही ‘वन डायरेक्शन’मध्ये काम करत आहे आणि दुसऱ्या समांतर विश्वात तो हा प्रश्न विचारणाऱ्या महिलेचा पती आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी हॉकिंग यांनी स्टार ट्रेक मालिकेतील संदर्भ घेत ‘बीम मी अप स्कॉटी’ असे म्हटले. त्यानंतर त्यांची सभागृहातील आभासी प्रतिमा दिसेनाशी झाली.