दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीतील (आप) अंतर्गत वादाचा शिमगा सुरूच असून, बुधवारी त्याने कळस गाठला. अरविंद केजरीवाल यांनी सरकार स्थापन करण्यासाठी गेल्या वर्षी काँग्रेसचे सहा आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पक्षाच्या एका माजी आमदाराने एक ध्वनिफीत जाहीर करून केला. तर केजरीवाल यांना तत्त्वांच्या रक्षणासाठी पाठिंबा दिला होता, घोडेबाजार करण्यासाठी नाही, असा आरोप करीत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
केजरीवाल यांची पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नव्हती, त्यामुळे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सातत्याने काँग्रेसच्या आमदारांच्या संपर्कात होते. या आमदारांनी पक्षातून फुटून नवा राजकीय पक्ष स्थापन करावा आणि ‘आप’ला बाहेरून पाठिंबा द्यावा यासाठी सिसोदिया प्रयत्न करीत होते, असा आरोप माजी आमदार राजेश गर्ग यांनी केला. या संदर्भातील एक ध्वनिफीत सादर करण्यात आली असून, त्यामध्ये केजरीवाल हे काँग्रेसमधील फुटीबाबत संभाषण करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
गर्ग यांनी हा गौप्यस्फोट करताच मुंबईतील ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले. केजरीवाल यांना तत्त्वांसाठी पाठिंबा दिला होता, घोडेबाजार करण्यासाठी नाही, असे दमानिया म्हणाल्या, असे दमानिया यांनी ट्विट केले आहे. या सर्व आरोपांची ४८ तासांत चौकशी करावी, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
यादव, भूषण यांनी आरोप फेटाळले
पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी फेटाळला असून ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एकतर्फी निर्णयावरच प्रश्नचन्हि उपस्थित केले आहे. यादव आणि भूषण यांनी कार्यकर्त्यांसाठी एक संयुक्त पत्र जारी केले आहे.
ध्वनिफितीतील संवाद..
केजरीवाल गर्ग यांना म्हणाले, आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहोत, परंतु काँग्रेस आम्हाला पाठिंबा देण्यास तयार नाही. मनीष सिसोदिया सातत्याने काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पाडा आणि त्यांच्या सहा आमदारांना नवा राजकीय पक्ष स्थापन करून आम्हाला पाठिंबा देण्यास सांगा.
केजरीवाल पुढे म्हणाले, सहा आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. मात्र त्यापैकी तीन मुस्लीम असल्याने ते भाजपला पाठिंबा देणार नाहीत. त्यामुळे या सहा आमदारांचा पाठिंबा आपल्याला मिळू शकतो.

केजरीवाल यांना तत्त्वांसाठी पाठिंबा दिला होता, घोडेबाजार करण्यासाठी नाही. अशा प्रकारचा मूर्खपणा करण्यासाठी आपण पक्षात प्रवेश केला नव्हता.
– अंजली दमानिया