मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील बेगमगड परिसरामध्ये संघ परिवाराने आयोजित केलेल्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणानंतर येथील प्रशासनाने ज्या झोपडपट्टीमधून ही दगफेक करण्यात आली तेथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याच ठिकाणी दगडफेक करणारे काहीजण राहत होते. या प्रकरणामध्यो पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या या महिला कारवाई करण्यात आलेल्या घरामध्ये राहत होत्या असं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र ही कारवाई पूर्वनियोजित असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. घरमालक तिकाराम आणि हमीद यांना आधी घर खाली करण्यासंदर्भात रितसर नोटीस पाठवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे.

शुक्रवारी समग्र हिंदू समाज, भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या उभारणासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाखाली एका रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र ही रॅळी बेगमगड येथे आली असता येथील काही घरांमधून रॅलीवर दगडफेक करण्यात आली.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये या परिसरातील काही घरांमधील महिलांनाही रॅलीमधील लोकांवर आणि दुचाकीस्वारांवर दगड आणि विटांचा मारा केल्याचे दिसून आलं. अचानक दगडफेक झाल्याने रॅलीमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचा दावा केल्याचे टीओआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

रॅलीवर झालेल्या दगडफेकीमध्ये रॅलीतील अनेक कार्यकर्ते जखमी झाले. या सर्वांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी उज्जैन पोलीस आणि उज्जैन महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या घरांमधून दगडफेक झाली त्या घरांची ओळख पटवून बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी या घरांवर कारवाई करण्यात आली. स्थानिकांनी या कारवाईला विरोध केला मात्र तरीही मोठा बंदोबस्त लावून या घरांवर कारवाई करण्यात आली.

महापालिकेने दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर केलेल्या कारवाईच्या वृत्तावर ट्विटवरुन प्रितिक्रिया देताना भजपा नेते तेजेंदर पाल सिंग बग्गा यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं कौतुक केलं आहे. “शिवराज मामा फॉर्म में है ,” असं बग्गा यांनी बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच एका सभेमध्ये बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी, “मध्य प्रदेश सोडा अन्यथा जमिनीत गाडून टाकेन, अन् कोणाला पत्ताही लागणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी गुन्हेगारांना इशारा दिला होता. “मी सध्या खतरनाक मूडमध्ये आहे. जे लोक चुकीचं काम करतात त्यांना मी सोडणार नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी मध्य प्रदेश सोडावं अन्यथा मी त्यांना जीवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन आणि कोणाला पत्ताही लागणार नाही,” असं मुख्यमंत्री चौहान म्हणाले होते.