जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानिकांकडून दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. येथे राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) सुरु केलेल्या कारवायांमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नक्षलवादी, दहशतवादी तसेच मुलतत्ववाद्यांच्या कारवायांमध्येही गेल्या तीन वर्षांत घट झाल्याची माहिती राजनाथ यांनी दिली.

लखनऊमध्ये एनआयएचे कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवास प्रकल्पाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राजनाथ म्हणाले, काश्मीरमध्ये एनआयएने सुरु केलेली कारवाई सर्वच जण जाणतात. फुटीरतावाद्यांना त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे येथे सैन्यावर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना घटल्या आहेत. आम्ही भारताच्या सुरक्षेची शपथ घेतली असून देशविघातक कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहोत. देशासमोरील आव्हाने आम्ही स्विकारली असून त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत नक्षलवाद, दहशतवाद आणि मुलतत्ववाद्यांच्या कारवायाही थंडावल्याचा दावा त्यांनी केला. ईशान्य भारतात मुलतत्ववाद्यांच्या कारवायांमध्ये ७५ टक्के तर नक्षलवादी कारवायांमध्ये ३५ ते ४० टक्के घट झाल्याचे राजनाथ यांनी यावेळी सांगितले.

टेरर फंडिंग संपवण्याबाबत राजनाथ म्हणाले, आपण बनावट नोटा आणि टेरर फंडिंगचे स्त्रोत उध्वस्त केल्याने दहशतवादाला हा मोठा झटका बसला आहे. याबाबत एनआयएने मोठे काम केले आहे. याठिकाणी आता एनआयएच्या नावानेच टेरर फंडिंगवाल्यांची घाबरगुंडी उडाली असून त्यांचा कणाच मोडल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्याच्या सुरक्षेसंदर्भात प्रत्येक सहा महिन्यांनी एनआयए आणि राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणांच्या बैठका घेणार असल्याचे यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना राजनाथ म्हणाले, चांगल्या समन्वयाशिवाय यश मिळणार नाही. त्यासाठी सतत माहितीची देवाण घेवाण करणे आवश्यक आहे.

लखनऊमध्ये तयार करण्यात आलेले एनआयएचे कार्यालय आणि निवासी कॉम्प्लेक्स ही देशातील पहिलीच योजना आहे. एनआयबद्दल माहिती देताना राजनाथ म्हणाले की, एनआयएने १६५ प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले आहेत. यामध्ये ९५ टक्के प्रकरणांत न्यायालयाकडून दंडात्मक कारवाई झाली आहे. यावरून एनआयएने स्वतःची एक विश्वासार्हता निर्माण केली आहे.

लखनऊमधील एनआयएच्या युनिटने २० केसेसमध्ये आरोपपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये दहशतवादी कारवाया, पटना येथिल बॉम्बस्फोट प्रकरण, बोध गया येथिल स्फोट तसेच बिजनौर आणि कानपूर येथिल आयसिस मॉडेल प्रकरणांचा समावेश आहे.