भारतात विविध भागात मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या परंपरा मानल्या जातात. अशीच एक अनोखी परंपरा उत्तराखंडमध्ये साजरी केली जाते. पिथौरागड येथील चंपावत जिल्ह्यात एका देवीसमोर गावातील नागरिक एकत्र येतात आणि एकमेकांवर फळे आणि फुले फेकून मारतात. रक्षाबंधनच्या दिवशी एकमेकांना दगड फेकून मारत ही परंपरा साजरी केली जात होती. दगडफेकीमुळे लोक रक्तबंबाळ होणे आणि काहींचा मृत्यू होण्याच्याही घटना घडत. अशाप्रकारे देवीला बलिदान देऊन प्रसन्न करणे ही त्यामागील मुख्य धारणा होती. मात्र अशाप्रकारे लोकांचे जीव जाणे योग्य नसल्याने उच्च न्यायालयाने या परंपरेवर बंदी घातली. त्यामुळे २०१३ पासून दगडांऐवजी फळे आणि फुले मारुन ही परंपरा साजरी केली जाऊ लागली. या महोत्सवाला बग्वाल महोत्सव म्हणून ओळखले जाते.

यावर्षीही देवीधुरातील वाराही देवी मंदिरात रक्षाबंधनच्या दिवशी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव दुपारच्या वेळी साधारण ८ मिनिटांसाठी खेळला गेले असे मंदिर समितीच्या सदस्यांनी सांगितले. या उत्सवासाठी ६०० किलो फळांची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली होती. याआधी दगडांनी हा खेळ खेळला जात होता. त्यामुळे व्यक्तीच्या शरीरातून रक्त आल्यावर देवी प्रसन्न होते असे मानून मंदिरातील पुजारी रक्त पाहून संतुष्ट होईपर्यंत खेळ खेळला जायचा.

आता दगड फेकण्यास मनाई करण्यात आली असूनही अनेक लोक अजूनही या उत्सवात दगडांचा वापर करतात. यावर्षी अशाप्रकारे दगड वापरल्याने ११२ लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये उत्तराखंडमधील चार समुदायाचे लोक एकत्र येत हा उत्सव साजरा करतात. त्यात चम्याल, वाल‍िक, लमगड‍िया गढ़वाल यांचा समावेश असतो. या महोत्सवादरम्यान पाऊस आल्यास ते अतिशय शुभ असते असेही येथील एका समुदायाचे मानणे आहे.