दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर आणि पोस्टर बॉय समीर टायगरचा सुरक्षा दलांनी खात्मा केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. राज्यातील कानीपोरा भागात दंगेखोरांनी एका स्कूल बसवर दगडफेक केली असून यात एक मुलगा जखमी झाला आहे. या बसमध्ये ४-५ वर्षांची छोटी मुले जात होती, असे सांगण्यात येते.

माझा मुलगा दगडफेकीत जखमी झाला आहे. हे मानवतेच्या विरोधात आहे. हे कोणत्याही निष्पापाबरोबर होऊ शकते, असे दगडफेकीत जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलाने म्हटले. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेचा निषेध केला असून मुलांवर हल्ला करणाऱ्यांवर टीका केली आहे. लहान मुलं आणि पर्यटकांवर दगडफेक करून या दंगेखोरांचा अजेंडा कसा पूर्ण होत आहे, अशा प्रकारच्या हल्ल्यांना स्पष्टपणे विरोध केला पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले.

यापूर्वी पुलवामा येथे एका नागरिकाच्या मृत्यूनंतर फुटीरवादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. बंदमुळे रेल्वे, इंटरनेट, दुकाने आणि वाहतूक बंद करण्यात आली होती. यापूर्वी सोमवारी हिज्बुलचा कमांडर समीर टायगर आणि त्याचा सहकारी अकीब द्रबगाम सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला होता. त्याच भागात दगडफेक झाली. दंगेखोर आणि सुरक्षादलामध्ये चकमकही उडाली होती. यामध्ये शाहीद (वय १४) मारला गेला तर इतर १५ जण जखमी झाले होते.