News Flash

सिंघू-टिकरी परिसरात तणाव

शेतकऱ्यांवर दगडफेक आणि मारहाण; आंदोलकांवर आणखी दबाव

(संग्रहित छायाचित्र)

सिंघू सीमेवर सुमारे दोनशे जणांच्या जमावाने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ातही शेतकऱ्यांवर दगडफेक आणि मारहाण केली. त्यांच्या तंबूंची मोडतोड केली. त्यामुळे आंदोलनस्थळी शुक्रवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. या घटनेत काही शेतकरी जखमी झाले.

हा संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलीस अधिकाऱ्यावर तलावरीने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. हे विरोधक स्थानिक रहिवाशी असल्याचे सांगितले जात असले तरी, भाजपसमर्थक टोळके असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. टिकरी येथेही स्थानिक रहिवाशांनी शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीनही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर शेतकरी नेत्यांना शुक्रवारी नोटिसा बजावल्या असून तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आल्या आहेत. या नोटिशांना शनिवारी नेत्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल.

आंदोलनाला पुन्हा उभारी

‘मी आंदोलन गुंडाळून निघून जाऊ शकलो असतो किंवा स्वत:ला अटकही करून घेतली असती पण, तसे केले असते तर, शेतकऱ्यांवर देशद्रोहाचा डाग लागला असता, तो कधीही पुसला गेला नसता आणि हेच मला मान्य नाही. आंदोलनाविरोधात षडयंत्र रचले असून आता मी जीव गेला तरी हटणार नाही, असे सांगत भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी नवी उभारी दिली.

प्रजासत्ताक दिनी लालकिल्ला, आयटीओ व अन्यत्र झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर शेतकरी आंदोलनावरील दबाव वाढू लागला आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्यानंतर गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांना आंदोलनस्थळावरून उठवण्याचे प्रयत्न गुरुवारी उत्तर प्रदेश प्रशासनाने केले. आंदोलन संपवण्यासंदर्भात गाझीपूर पोलिसांनी टिकैत यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना दगाफटका होण्याची भीती व्यक्त करत टिकैत यांनी ‘गोळी मारली तरी हटणार नाही’ असे भावनिक आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पश्चिम उत्तर प्रदेश आणि दक्षिण हरियाणातील जाट समाजाने टिकैत यांना पाठिंबा दिला. खात पंचायतींनीही टिकैत यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. त्यामुळे हजारोंच्या संख्येने शेतकरी शुक्रवारी सकाळी गाझीपूरच्या सीमेवर आंदोलनस्थळी येऊन दाखल झाले. प्रजासत्ताक दिनानंतर गावी गेलेले शेतकरी पुन्हा गाझीपूरला परतल्यामुळे गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा ओघ वाढला.

‘आप’चा मदतीचा हात

गाझीपूर प्रशासनाने आंदोलनस्थळावरील वीज व पाण्याचा पुरवठा तोडला असला तरी दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’ सरकारने दोन्ही पुरवण्याची तयारी दाखवली. गावाकडून पाणी आल्याशिवाय पाणी घेणार नाही असे टिकैत म्हणाले होते. त्यांच्यासाठी पाणी आणले गेले व लहान मुलाच्या हस्ते टिकैत यांना दिले गेले. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी मुझफ्फरनगर येथे ‘महापंचायत’ घेऊन आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. छोटय़ा-छोटय़ा गटांमध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीकडे रवाना होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

‘आंदोलन कायम राहील’

गाझीपूर सीमेवर संयुक्त किसान मोर्चातील दर्शन पाल, योगेंद्र यादव आदी नेतेही येऊन दाखल झाले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी लक्षात घ्यावे की, केंद्र व राज्य सरकारने शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा, त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला, आता शेतकरी कोणत्याही परिस्थितीत मागे फिरणार नाहीत, आंदोलन कायम राहील, असा इशारा स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिला. काँग्रेस, आप आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही गाझीपूर सीमेवर टिकैत यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे दीडशे शेतकऱ्यांचा जथा पलवलहून गाझीपूर सीमेवर येऊन दाखल झाला आहे. ‘डकैतला (दरोडेखोर) पाठिंबा द्यायचा की टिकैत यांच्या पाठीशी उभे राहायचे, हे आता देशाच्या जनतेने ठरवावे’, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी गाझीपूरमधील सभेत केले.

संसदेत पडसाद

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी शुक्रवारी, शेतकऱ्यांच्या पुन्हा तीव्र झालेल्या आंदोलनाचे पडसाद उमटले. लोकशाही मूल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन लोकांच्या जगण्याशी संबंधित सर्व प्रश्नांवर सदस्यांनी संसदेत चर्चा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिभाषणासाठी मध्यवर्ती सभागृहात जाण्याआधी केले. मात्र, ठरल्याप्रमाणे १९ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 12:16 am

Web Title: stone throwing and beating on farmers in singhu tikri area abn 97
Next Stories
1 दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण: घटनास्थळी सापडलं बंद पाकिट
2 काश्मीर: त्राल सेक्टरमध्ये भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
3 दिल्ली बॉम्बस्फोट: परराष्ट्र मंत्र्यांची इस्त्रायलच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा; गृहमंत्री अमित शाहंनी घेतली माहिती
Just Now!
X