बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी जोरादार प्रचार सुरू आहे. दरम्यान, आज(मंगळवार) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे जेव्हा मधुबनी येथील हरलाखी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेसाठी पोहचले तेव्हा त्यांना विरोधाला तोंड द्यावे लागले. या ठिकाणी जेव्हा नितीश कुमार भाषण करत होते. तेव्हा त्यांच्यावर दगड फेकण्यात आला.

यानंतर, दगड फेकणाऱ्या व्यक्तीने घोषणाबाजी देखील सुरू केली होती. तेवढ्यात नितीश कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, नितीश म्हणाले की, ”फेका, फेका .. जेवढे फेकायचे आहेत तेवेढे फेका. या लोकांना सोडून द्या काही दिवसानंतर त्यांना स्वतःलाच समजेल.” यानंतरही नितीश कुमार यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. यावेळी त्यांच्या सभोवताली सुरक्षा रक्षकांनी एकप्रकारे कडे तयार केले होते.

आणखी वाचा- लोकसभा, राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

आणखी वाचा- “लिहून घ्या… नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत”

मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, यासाठीच आम्ही सांगत आहोत की, सरकार आल्यानंतर रोगाराच्या संधी निर्माण होतील व कोणालाही बाहेर जावं लागणार नाही. जे आज शासकीय नोकऱ्यांबद्दल बोलत आहेत. जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा त्यांनी किती लोकांना रोजगार दिला. या अगोदर देखील अनेकदा नितीश कुमार यांना विरोधास सामोरं जावं लागलेलं आहे. अनेक प्रचार सभांदरम्यान त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली आहे.