21 September 2020

News Flash

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम

स्थानिकांकडून दगडफेक

| May 5, 2017 03:10 am

संग्रहित छायाचित्र

स्थानिकांकडून दगडफेक; दहशतवादी लपून बसल्याची शक्यता

चालू महिन्यांमध्ये दहशतवाद्यांकडून होत असलेले हल्ले, बँका तसेच दुकाने लुटण्याच्या घटना घडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र स्थानिक नागरिकांकडून होत असलेल्या दगडफेकीमुळे या मोहिमेत अडथळे येत आहे.

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोपिया जिल्हय़ाच्या जैनपोर येथील सहा गावांमध्ये ही मोहीम हाती घेतली असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.

मध्यरात्री सुरू करण्यात आलेल्या या शोधमोहिमेत मोठय़ा संख्येने सुरक्षा दल सहभागी झाले आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून सुरक्षा दलावर होत असलेल्या दगडफेकीमुळे या मोहिमेत अडथळे निर्माण होत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

ज्या ठिकाणी नागरिकांडून दगडफेक करण्यात येत आहे, त्या ठिकाणी लष्कराची अधिक कुमक मागविण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसून, दहशतवाद्यांची  शोधमोहीम सुरूच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद्यांकडून अनेक व्हिडीओ व्हायरल

अधिकाऱ्यांद्वारा २२ संकेतस्थळे आणि अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्यानंतरही काही दहशतवादी संघटना समाजमाध्यमांवर व्हिडीओ पाठवत आहेत. अशा प्रकरणांची संख्या ३०वर गेली आहे. हे व्हिडीओ दक्षिण काश्मीरमधून विशेषत: शोपिया जिल्हय़ातून पसरवले जात असल्याचा सुरक्षा संस्थांना संशय आहे.

भारताच्या प्रक्षोभक विधानांमुळेवातावरण दूषित होईल -पाकिस्तान

इस्लामाबाद : भारताने ‘प्रक्षोभक विधाने’ केल्यास क्षेत्रीय वातावरण आणखी दूषित होईल, असे पाकिस्तानी लष्कराच्या सक्रिय सहभागानेच भारतीय सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली असे भारताने ठामपणे म्हटल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने गुरुवारी सांगितले.

भारतीय सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना होण्याची कुठलीही घटना घडलेली नाही, ही बाब पाकिस्तानने स्पष्ट केली आहे, असे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. भारताच्या अशा ‘प्रक्षोभक वक्तव्यांमुळे’ या क्षेत्रातील वातावरण दूषित होईल, असे सांगून झकेरिया म्हणाले की, भारताने त्याच्या अंतर्गत राजकीय डावपेचांसाठी आणि काश्मीरमधील ‘अत्याचारांपासून’ लक्ष विचलित करण्यासाठी नेहमीच ‘पाकिस्तान कार्डाचा’ वापर केला आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटाला कधीच सहकार्य न केल्यामुळे त्याने केलेले आरोप संयुक्त राष्ट्रांपुढे नेण्याचा हक्क त्याने गमावला आहे, असेही मत झकेरिया यांनी व्यक्त केले.

 

पाकला चोख प्रत्युत्तर देणार! लष्करप्रमुख बिपिन रावत यांचे संकेत

नवी दिल्ली : आपण आखलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यापूर्वी भारतीय लष्कर त्या उघड करत नाही असे सांगून, जम्मू- काश्मीरमध्ये दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करण्याच्या पाकिस्तानी लष्कराच्या कृतीला प्रत्युत्तर देण्याचे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी दिले.

पाकिस्तानने केलेल्या या पाशवी कृत्याला लष्कर प्रत्युत्तर देईल काय, याबद्दल पत्रकारांनी जनरल रावत यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. या प्रश्नांना थेट उत्तर न देता, आपले सैन्य शेजारी देशाच्या अशा कारवायांना परिणामकारकरीत्या प्रतिसाद देईल, असे ते म्हणाले.

आमच्या आगामी योजनांची आम्ही आधीच चर्चा करत नाही. या योजना प्रत्यक्ष अमलात आणल्यानंतर आम्ही त्याबाबतचे तपशील सांगतो, असे सांगून रावत यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.

पत्रकारांनी खोदून विचारले असता लष्करप्रमुख म्हणाले, की अशाप्रकारची कृत्ये घडतात, त्यावेळी आम्हीही त्याला योग्य ती प्रत्युत्तर देणारी कृती नक्कीच करतो.

पाकिस्तानी लष्कराच्या या कृत्याचे भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देईल. मात्र त्याची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू, असे लष्कराचे उपप्रमुख शरतचंद्र यांनी मंगळवारी म्हटले होते. तर, दोन सैनिकांचे हौतात्म्य वाया जाणार नाही आणि पाकिस्तानी फौजांच्या या अमानवी कृत्याला भारतीय सैन्य ‘योग्य ते’ प्रत्युत्तर देईल असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले होते.

लष्कराचा एक अधिकारी व बीएसएफचा एक जवान यांचा १ मे रोजी नियंत्रण रेषेवर शिरच्छेद करण्याच्या पाकिस्तानी बॉर्डर अ‍ॅक्शन टीमच्या कृत्याला प्रतिसाद देण्याबाबतच्या विविध पर्यायांबाबत लष्कर विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 3:10 am

Web Title: stones thrown by kashmir civilians on indian army
Next Stories
1 उत्तर प्रदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिकवणार
2 वैद्यकीय तपासणी करण्यास कर्णन यांचा स्पष्ट नकार
3 हिंदी सक्तीसाठी न्यायालयाचा नकार
Just Now!
X