X

जंतरमंतरवरील सर्व आंदोलने ताबडतोब थांबवा; हरित लवादाचे दिल्ली सरकारला आदेश

रामलीला मैदान उपलब्ध करुन द्यावे

राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावरील सर्व प्रकारची आंदोलने, मोर्चे आणि घोषणाबाजी ताबडतोब थांबण्यात यावी असे आदेश हरित लवादाने दिल्ली सरकारला दिले आहेत. ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी न्या. आर. एस. राठोड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा निर्णय घेतला.

नवी दिल्ली महानगरपालिकेने कॉनॉट प्लेस परिसरातील जंतरमंतर मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेले स्टेज, लाऊड स्पीकर आणि जाहीर सभांसाठी वापरण्यात येणारी उपकरणे तातडीने हटवण्यात यावीत. येथे होणारी धरणे आंदोलनं, निषेध आंदोलनं, उपोषण, मोर्चे, सार्वजिक भाषणे, लाऊड स्पीकरचा वापर आदी प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावेत असे आदेश दिल्ली सरकार, नवी दिल्ली महानगरपालिका, दिल्ली पोलीस आयुक्तांना लवादाने दिले आहेत. येथे होणारी नियोजित आंदोलने रामलीला मैदानावर स्थलांतरीत करण्यात यावीत असे सांगताना लवादाने म्हटले आहे. या भागात सातत्याने होत असलेल्या आंदोलनांमुळे येथील पर्वावरणविषयक कायद्यांचे उल्लंघन होत आहे.

त्याचबरोबर या भागात साठलेला कचरा ४ आठवड्यात हटवून सर्व परिसर स्वच्छ करण्याचे आदेशही महापालिकेला देण्यात आले आहेत. या प्रकरणी वरुण सेठ या व्यक्तीने हरित लवादात याचिका दाखल केली आहे. या ठिकाणी नेहमीच प्रचंड ध्वनी प्रदूषण होत असते. तसेच स्वच्छता नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याची तक्रारही त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे.

येथील दिल्ली जल बोर्डाच्या टँकरखाली पुरुष, स्त्रीया आणि लहान मुले आंघोळ करतात, कपडे धुतात त्यामुळे इथली परिस्थिती आणखीनच वाईट बनली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या झोपेचा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे सेठ यांनी याचिकेत म्हटले आहे.

First Published on: October 5, 2017 7:43 pm
Outbrain