दिल्लीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. मोदीजी कृपया तुमचा हट्टीपणा सोडा आणि आमच्याबरोबर काम करा. पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची (एसीबी) सूत्रे राज्य सरकारकडे द्या. एका वर्षात आम्ही तुम्हाला बदल घडवून दाखवू, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. याशिवाय, केजरीवाल यांनी ट्विटमध्ये दिल्लीतील भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे सांगत यावरून आम आदमी पक्षाचा हेतू आणि प्रशासकीय क्षमता सिद्ध होत असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांवर टीका केली होती. दिल्लीत जंगलराज असेच चालू राहीले तर नरेंद्र मोदी यांना शांतपणे झोपू देणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला होता.