जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदण्याकरिता सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबणे ही पूर्वअट असल्यामुळे, ही घुसखोरी थांबवावी असे पाकिस्तानला सांगण्याची गरज आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे. पाकने दहशतवाद्यांवर लगाम ठेवावा, असे आवाहन त्यांनी काल केले होते.
सीमेपलीकडून कुणालाही इकडे येण्याची मुभा दिली जाऊ नये असे पाकिस्तान, त्या देशाचे पंतप्रधान आणि प्रशासन यांना सांगायला हवे. तरच येथे शांतता राहील, अन्यथा नाही असे सईद यांनी विधान परिषदेत सांगितले. पीडीपीचे आमदार यशपाल शर्मा यांच्या प्रश्नाबाबत अनेक सदस्यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात ते बोलत होते.
सीमेपलीकडून होणारा गोळीबार दोन्ही देशांकरिता चांगला नाही. दोन्ही बाजूंचे लोक गोळीबारात मरतात. जम्मू-काश्मीरच्या लोकांना सर्वात जास्त सहन करावे लागते. त्यामुळे सीमाभागात शांतता सुनिश्चित करण्यासाठी धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे, असे सईद म्हणाले.
पीडीपीच्या या पूर्वीच्या कार्यकाळात सीमेवर काटेरी कुंपण उभारल्याबद्दल सैन्याची प्रशंसा करून सईद म्हणाले की,, २००२ ते २०१० या काळात कारगिलपासून कथुआपर्यंत सीमेवर गोळीबार होत नव्हता. सीमेवर कुंपण उभारण्यास आम्ही तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल एन.सी. विज यांना सांगितले होते व त्यानुसार हे कुंपण उभारले गेले होते. हे कुंपण घुसखोरीला आळा घालण्यासाठी प्रभावी ठरले होते. घुसखोरीसाठी हे कुंपण कापण्याचे तंत्रज्ञान वापरून आता दहशतवाद्यांनी कुंपणातून शिरण्याकरिता जागा शोधली आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करणे हे आमचे ध्येय व लक्ष्य असायला हवे, असे सईद म्हणाले.