हवं तर मला गोळ्या घाला पण दलितांवर हल्ले करू नका, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्या आणि खासदार रेणुका चौधरी यांनी मंगळवारी खरपूस समाचार घेतला. केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारचे ढोंगी दलितप्रेम न ओळखता येण्याएवढी देशातील जनता मूर्ख नाही. निवडणुकीतील फायदा डोळ्यासमोर ठेवूनच हे वक्तव्य करण्यात आले असल्याचा आरोप रेणुका चौधरी यांनी केला.
त्या म्हणाल्या, खरंतर मला हसावे की रडावे काहीच कळत नाही. प्रत्येकजण आता दलितप्रेमी झाल्याचे पाहून मला आनंदच होतो आहे. पण प्रश्न एवढाच आहे की, दलितांबद्दल मला कळवळा आहे, असे बोलून तुम्ही खरंच दलित समाजाची सेवा करत आहात का? हे ढोंगी दलितप्रेम थांबवा. दलित समाजातील लोकांना तुमच्या बोलण्यामागचा उद्देश कळू लागला आहे. तुम्ही फक्त त्यांच्या बाजूने बोलला म्हणून ते तुम्हाला मते देणार नाहीत, असे रेणुका चौधरी यांनी म्हटले आहे.
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दलित समाजाबद्दल अशा पद्धतीने कणव दाखवणे हे एक प्रकारे त्यांची पिळवणूक करण्यासारखेच आहे. जर सरकारला खरंच दलित समाजाबद्दल प्रेमाची, आपुलकीची भावना असेल, तर त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.