जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकवणाऱ्यांचा कठोर शब्दात समाचार घेत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या कारवाया भारतात खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी फुटीरतावाद्यांना तंबी दिली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, मसूद अझहर, झकीर लख्वीविरोधात भारताने ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी भारत सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही राजनाथ यांनी दिली. दरम्यान, राजनाथ यांच्या इशाऱ्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये पुन्हा पाकचा झेंडा फडकविण्यात आला आहे. या प्रकरणी फुटीरतावादी नेता शबीर शाहसह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाजपप्रणीत रालोआ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त गृहखात्याच्या कामकाजाची माहिती राजनाथ यांनी दिली. भारताला केवळ अर्थशास्त्रीची (मनमोहन सिंग) यांची नव्हे तर यथार्थशास्त्री नेतृत्वाची (नरेंद्र मोदी) गरज असल्याची टीका कुणाचेही नाव न घेता राजनाथ यांनी यावेळी केली.   
जम्मू-काश्मिरात सुधारणा
जम्मू-काश्मीर सीमेवरून भारतात २०१३ मध्ये २७७ घुसखोरांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. २०१४ मध्ये अशी २२२ प्रकरणे समोर आली. २०१३ मध्ये लष्कराने ६७१ दहशतवाद्यांना ठार मारल्याचे राजनाथ यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. जम्मू-काश्मीरवर विशेष लक्ष असल्याने तेथील युवकांना रोजगारनिर्मितीसाठी घेण्यात आलेल्या ‘उडान’ अभियानात आतापर्यंत ९ हजार युवकानां रोजगार मिळाल्याचे राजनाथ म्हणाले.
दिल्ली राज्य सरकार व नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात सुरू असलेल्या वादावर बोलण्याचे मात्र राजनाथ यांनी टाळले. हा लढा आता न्यायालयात गेला आहे. परंतु केंद्राची भूमिका स्पष्ट  आहे. कोणताही निर्णय घटनेंतर्गतच होईल, असे स्पष्ट करून राजनाथ  यांनी आम आदमी पक्षाच्या आरोपांचे खंडन केले. नायब राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकार दिल्लीचे राज्य चालवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता.
’देशभरात उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य आपात्कालीन निवारण निधीतून मदत राज्य सरकारला देता येईल, असे  राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
’वर्षभराच्या कारकीर्दीचा आढावा घेताना राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले.
’राम मंदिर, गोवंश हत्याबंदीसारख्या संवेदनशील मुद्दय़ांनादेखील राजनाथ सिंह यांनी बगल दिली.
’गेल्या काही दिवसांपासून राजनाथ सिंह यांच्या नाराजीच्या बातम्या येत आहेत. त्यावर ते म्हणाले की, पंतप्रधान हेच सर्वोच्च असतात. मी त्यांच्याच नेतृत्वात काम करीत आहे.
’जमीन अधिग्रहण विधेयकावरून संघपरिवारातील संघटना- भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ सरकारविरोधात गेल्या आहेत. त्यावर थेटपणे बोलण्याचे राजनाथ सिंह यांनी टाळले.
’परिवारातील प्रत्येक संघटना स्वतंत्र आहे. प्रत्येक वेळी त्याचा संबंध भाजपशी जोडणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
नक्षलवाद संपवणे शक्य
नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्राने नवी योजना आखली आहे. त्यामुळे २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये नक्षलग्रस्त भागातील चकमकीत मारले गेलेल्यांची संख्या २२ टक्क्यांनी घटली आहे. २०१३ मध्ये २८२ दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. मात्र २०१४ मध्ये ६७  दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.