जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्या सुरू झालेल्या कुरापती पाहता, आता भारताकडूनही कडक पवित्रा घेण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. भारताकडून सिंधू नदीद्वारे पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्यात कपात करण्याचे संकेत देण्यात आले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज याबाबत इशारा दिला आहे.

सिंधू जल करारानुसार ठरल्या पेक्षाही भारताच्या हिस्स्याचे जास्त पाणी पाकिस्तानला जाते. आता आम्ही या कराराला कुठेही धक्का न लावता भारताच्या वाट्याचे असलेल्या मात्र पाकिस्तानला जाणाऱ्या या अतिरिक्त पाण्याचा वापर शेतकरी, उद्योग व वीज निर्मितीसह नागरिकांना पुरवण्यासाठी करणार आहोत. यासाठी आम्ही हाइड्रोलॉजिकल और टेक्नो फिजिबिलिटी स्टडीजवर काम करत आहोत. हे कार्य लवकर झाले पाहिजे, असे मी आदेशही दिले आहेत. जेणेकरून आम्ही आपल्या योजना अंमलात आणू शकू.

यावेळी शेखावत यांनी कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले. यामध्ये पाकिस्तानला नाक खूपसण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले. काही दिवस अगोदरच पाकिस्तानने हा मुद्दा चीनच्या मदतीने यूएनएससीमध्ये मांडला होता. मात्र, त्या ठिकाणी दोन्ही देशांच्या पदरी निराशाच आली होती. त्यानंतरही पाकिस्तान शांत बसलेला नाही. कालच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून आम्ही हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.