काही दिवसांपासून देशात करोनानं थैमान घेतलं आहे. एकीकडे देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत तर दुसरीकडे योग्य त्या उपचारानंतर काही करोनाग्रस्तांना त्यांच्या घरीही सोडण्यात आलं आहे. काही लोकं असे आहेत ज्यांनी करोनाविरूद्ध लढा दिला आणि बरे होऊन आज ते आपल्या घरीही गेले आहेत.

नेटफ्लिक्सची मदत
कोलकात्यात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला करोनाची लागण झाली होती. जेव्हा मार्च महिन्यात ती परदेशातून आली त्यावेळी तिला करोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर तिला दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं. त्यावेळी केवळ नेटफ्लिक्सची मदत घेऊन आपण हे दिवस काढल्याचं तिनं सांगितलं. “आम्हाला डॉक्टर्स भेटायला यायचे तेव्हा ते आम्हाला धीर द्यायचे,” असंही तिनं सांगितलं. “करोनामुळे कोणत्याही दहशतीखाली जगण्याची आवश्यकता नाही. फक्त चांगलं खा आणि आपल्या घरी राहा, आरोग्य उत्तम ठेवा,” असा संदेशही तिनं दिला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.


डॉक्टरांशी खिडकीतून चर्चा
पाटण्यात राहणाऱ्या एक ४५ वर्षीय महिला १० दिवसांच्या नेपाळ दौऱ्यानंतर ८ मार्चला भारतात परतल्या होत्या. परंतु काही दिवसांतच त्यांच्यात करोनाची लक्षणं दिसू लागली. त्यानंतर त्यांना पाटण्यातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ११ दिवस त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये घालवावे लागले होते. “या काळात डॉक्टर्स माझ्याशी खिडक्यांजवळ उभे राहून बोलायचे. ते योग्य करत होते पण मला ते खराब वाटत होतं. मला माझा मित्र परिवार आणि कुटुंबीयांकडून खुप मदत मिळाली. लोकांना यातून काही आशेचा किरण दिसावा यासाठी मी माझी गोष्ट सांगतेय. जगभरातून समोर येणारे आकडे अंगावर काटे आणणारे आहेत. परंतु कोणीही घाबरून जाऊ नका. करोनाचा उपचार होऊ शकतो आणि मी ते करून दाखवलंय,” असं त्या महिलेनं बोलताना सांगितलं,


क्वारंटाइनमध्ये राहून परीक्षेची तयारी

सूरतमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आपलीही कहाणी सांगितली. नुकतीच ती करोनाच्या आजारातून बाहेर आली आहे. सुरूवातील मला कोरडा खोकला आणि ताप आला. त्यावेळी तो फ्ल्यू चा ताप असल्याचं आम्हाला वाटलं. पण नंतर करोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. “यावेळी मी घाबरून गेली नाही. माझ्या परीक्षा जवळ आल्या होत्या. त्यामुळे मी त्याची तयारी केली. मी कायम सकारात्मक विचार ठेवले. तुमच्यात जर करोनाची कोणतीही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि करोनापासून वाचण्यासाठी लॉकडाउनचही पालन करा,” असंही तिंनं सांगितलं.


करोनाला हरवायचंच ठरवलं होतं

पाटण्यात राहणारा एक विद्यार्थी स्कॉटलंडमध्ये कंम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करत होता. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यानं भारतात येण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी तो भारतात आला तेव्हा विमानतळावर त्याच्यात करोनाची कोणतीच लक्षणं दिसली नाहीत. परंतु जेव्हा तो घरी आला त्यावेळी त्यानं करोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. “रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत:चा आत्मविश्वास वाढवला,” असं तो सांगतो. “करोनाशी लढायचंच असं मी मनाशी ठरवलं होतं. मी आत्मविश्वास ठेवला आणि करोनावर मात केली,” असंही त्यानं नमूद केलं.