दक्षिण जपानमधील बेटांना तडाखा देत अनेक लोकांना जखमी करणाऱ्या हायशेन वादळाने आता दक्षिण कोरियाला झोडपून काढले असून त्यामुळे इमारतींचे नुकसान झाले.

पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठले असून हजारो घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. कोरियाच्या हवामान प्रशासनाने सांगितले की, हायशेन वादळाने पूर्व किनारपट्टीवरील सोकचो शहराला सोमवारी दुपारी तडाखा दिला. त्यानंतर दक्षिण कोरियाचा दक्षिण व पूर्व भाग यांनाही फटका बसला आहे. नंतर वादळाची तीव्रता कमी होत गेली असून सकाळी ताशी १४४ कि.मी. वेगाने वारे वाहात होते. येत्या बारा तासात वादळाची तीव्रता कमी होत जाणार आहे.

जपान अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे की, किमान ३८ लोक वादळात जखमी झाले असून त्यात पाच गंभीर जखमी आहेत. हायशेन वादळाने जपानच्या वायव्य भागाला सप्ताहअखेरीस तडाखा दिला होता. त्यावेळी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. हिरोशिमा व इतर शहरात दुकाने बंद होती.

दक्षिण कोरियात उलसान येथे पुराच्या पाण्यात मार्ग काढणे मोटारींना कठीण जात होते. किनारी बुसान, सोकचो व गँगनेउंग  येथे आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी पडलेली झाडे दूर केली. अनेक ठिकाणी सिग्नलचे खांब व इमारती कोसळल्या. वादळात मोटार सापडून एकजण जखमी झाला. जेजू या दक्षिणेकडील प्रांतातून होणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. काही पूल व रेल्वेमार्ग बंद करण्यात आले. अनेक मच्छिमार बोटी व जहाजे सुरक्षित ठिकाणी आणण्यात आली. एकूण १६०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

जेजू व इतर भागात १७,६२० पैकी ११,५२३ घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो सोमवारी पूर्ववत करण्यात आला. जपानमध्ये ओकिनावा व दक्षिणेकडील बेटांना वादळाने तडाखा दिला. त्यामुळे वाहतूक विस्कळति झाली, देशांतर्गत विमाने रद्द करण्यात आली. शिबा येथे भूस्खलनात चार लोक बेपत्ता झाले. जपानमध्ये अनेक घरांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, पण अजून ३ लाख ४० हजार घरात वीज पुरवठा बंद आहे.

गेल्याच आठवडय़ात मेसॅक वादळाचा फटका बसलेल्या उत्तर कोरियाला आता या नवीन वादळाचा फटका बसणार आहे. दरम्यान उत्तर कोरियातील वुनसान व टोंगचोन येथे पूर आला आहे. उत्तर कोरियात मेसॅक वादळाने बरेच नुकसान केले असून रस्ते व इमारतींचे नुकसान झाले. मदत कार्यात १२ हजार कर्मचारी सहभागी आहेत. हे सगळे घडत असतानाच आता उत्तर कोरियाला हायशेन वादळ झोडपून काढणार आहे.