काश्मीर खोऱ्यात गुरुवारी झालेल्या तुफान बर्फवृष्टीने चार जणांचे बळी घेतले आहेत. या चार जणांमध्ये लष्कराच्या दोन हमालांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळे खंडित झालेला विजेचा पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करीत असताना कुपवाडा जिल्ह्य़ात मंझूर अहमद आणि इशाक खान हे दोन हमाल हिमनगाच्या तडाख्यात ठार झाले तर ऊर्जा विकास विभागाचा (पीडीडी) एक कर्मचारी विजेचा पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करीत असताना खांबावरून पडून जागीच ठार झाला. श्रीनगर जिल्हा प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना तातडीने दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

शहरातील हबक परिसरात बर्फवृष्टीमुळे चिनार वृक्षाची फांदी अंगावर कोसळून एक नागरिक ठार झाला, त्याचप्रमाणे एक टॅक्सी आणि रिक्षाचेही नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.