वर्गात पहिला नंबर आला की शौचालय बांधतो असे वचन माझ्या वडिलांनी मला दिले होते, पहिला नंबर आल्यानंतरही त्यांनी त्यांचं वचन पाळलं नाही. त्यांनी मला फसवलंय त्यामुळे त्यांना अटक करा अशी तक्रार दुसरीत शिकणाऱ्या मुलीने पोलिसांकडे केली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरंय. तामिळनाडूच्या अंबूर भागातील पोलीस स्थानकात ७ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांविरोधातच तक्रार केली आहे.

(छायाचित्र सौजन्य, बीबीसी)

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हनीफा जारा, असे या मुलीचे नाव. हनीफाने तिच्या वडिलांकडे शौचालय बांधण्याचा तगादा लावला होता. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने वडिल नेहमी टाळाटाळ करत राहिले. तू वर्गात पहिला नंबर मिळव मग शौचालय बांधतो असे तिला वडिलांनी सांगितले होते. त्यानुसार तिने वर्गात पहिला नंबर मिळवला आणि परत वडिलांकडे शौचालय बांधण्याबाबत विचारलं. त्यावर आपल्याकडे पैसे नाहीत असं सांगून त्यांनी तिची समजूत काढली. शौचालय बांधण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे दहा दिवस हनिफा तिच्या वडिलांशी बोलत नव्हती. पण उघड्यावर शौचालयाला जाण्याची हनीफाला खूप लाज वाटत होती. त्यामुळे सोमवारी(दि.10) पुन्हा तिने वडिलांकडे आपले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून विचारणा केली आणि त्यांनी नकार दिल्यामुळे चिडलेल्या हनिफाने थेट पोलीस स्थानकात जायचं ठरवलं.

वडील ऐकत नाहीत म्हणून हनीफाने तिच्या आईला पोलिसांकडे घेऊन जाण्याची विनंती केली. आईने घरच्या आर्थिक परिस्थितीबाबत तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी हनीफा आपल्या जिद्दीवर ठाम राहिली आणि अखेर तिची आई मेहरिन हिला घेऊन ती शाळेच्या जवळील पोलीस स्थानकात पोहोचली. महिला पोलीस अधिकारी ए वलरमाथी यांच्या टेबलवर आतापर्यंत मिळालेली प्रमाणपत्र आणि ट्रॉफी तिने मांडल्या आणि एक पत्र त्यांच्या हातात दिलं. यामध्ये, वर्गात पहिला नंबर आला की शौचालय बांधतो असे वचन माझ्या वडिलांनी मला दिले होते, पहिला नंबर आल्यानंतरही त्यांनी त्यांचं वचन पाळलं नाही. त्यांनी मला फसवलंय त्यामुळे त्यांना अटक करा असं लिहिलं होतं.

नर्सरीमध्ये होती तेव्हापासून नेहमी माझा पहिला नंबर येतो, तरीही वडिलांनी अजून आश्वासन पूर्ण केलं नाही अशी तक्रार तिने पोलिसांकडे केली. या लहान मुलीची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी सॅनेटरी ऑफिसरला फोन केला आणि हनीफाच्या कुटुंबियांना मदत करण्यास सांगितले. तोपर्यंत पोलिसांनी हनीफाच्या वडिलांना फोन करुन बोलावून घेतले होते. पोलीस स्थानकातून फोन आल्यामुळे तिचे वडिल एहसानुल्लाह भलतेच हैराण झाले आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर बोलावण्याचं कारण समजल्यामुळे अजूनच जास्त धक्का बसल्याचं तिचे वडिल म्हणाले. मी शौचालय बांधायला सुरूवात केली होती, पण हॉटेलच्या कँटिनमधील काम सुटल्यामुळे पैशांची चणचण जाणवायला लागली आणि तेव्हापासून ते काम अर्धट राहिलं असं तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं.

तोपर्यंत हनिफाने पोलिसांचं मन जिंकलं होतं. पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला सर्व माहिती दिली आणि शौचालय बांधण्याचं आश्वासन हनिफाला दिलं, त्यानंतर ती आनंदाने घरी जायला तयार झाली. नंतर या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तिच्या घरी शौचालयाची निर्मिती केली. आता अंबूर नगरपालिकेने आपल्या स्वच्छ भारत मिशनचे हनीफाला ब्रँड अम्बेसडर बनवले आहे.