डिसेंबर २०१३ पासून इराणमध्ये अडकून पडलेल्या दोन भारतीय अभियंत्यांपैकी संकेत पंडय़ा याने सुटकेसाठी केंद्र शासनाला साकडे घातले आह़े आमची सुरक्षित आणि लवकर सुटका करण्यात यावी, असे गाऱ्हाणे त्यांने घातले आह़े  ते गोव्यातील कंपनीचे कर्मचारी असून कामानिमित्त इराणमध्ये गेलेले असताना तेथील कंपनीशी त्यांच्या कंपनीचे वाद झाल्यामुळे त्यांची पारपत्रे अनधिकृतरीत्या काढून घेण्यात आली आहेत़
इराकमधील राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेल्या ३९ भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चालविलेल्या प्रयत्नांचे पंडय़ा याने कौतुक केले आहे आणि तशीच राजकीय इच्छाशक्ती आपण आणि आपला मित्र मोहम्मद हुसेन खान याच्या सुटकेसाठीही दाखविण्याची विनंती त्याने केली आह़े  अनेकदा अर्ज-विनंत्या करूनही आधीच्या यूपीए शासनाने आमच्या सुटकेसाठी प्रयत्न केले नाहीत आणि आम्हाला गेल्या सहा महिन्यांपासून इराणमध्ये अडकून पडावे लागले आहे, असे आरोपही त्याने केला आह़े
इराणमधील झंजन शहरातील वजारजहान या खासगी अभियांत्रिकी कंपनीचे गोव्यातील ‘पॉवर इंजिनीअरिंग इंडिया प्रा़ लि़ ’ या कंपनीशी काही व्यावसायिक वाद झाल़े  त्यानंतर इराणमध्ये असणारे ‘पॉवर इंजिनीअरिंग इंडिया’चे अभियंते पांडय़ा आणि खान या दोन अभियंत्यांची पारपत्रे या कंपनीने काढून घेण्यात आली आहेत़  हे दोघेही येथील वीज प्रकल्पाच्या जोडणीचे काम करण्यासाठी भारतातून गेलेल्या अभियंत्यांच्या चमूचा भाग होत़े  
जानेवारी महिन्यात दोघांनांही झंजन येथील अतिथीगृहातून बाहेर काढून तेहरान येथील हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप होत आह़े  परंतु, आमच्या कंपनीने हॉटेलचे भाडेही न भरल्यामुळे आता आम्हाला या हॉटेलमधून हाकलून देण्यात आले आह़े  त्यामुळे सध्या आम्हाला जवळच्या एका गुरुद्वारामध्ये राहावे लागत आहे, असेही पांडय़ा याने पत्रात कथन केले आह़े