गुजरातमधील भाजपाचे आमदार बलराम थवानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या नीतू तेजवानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला होता. मात्र, यापेक्षाही आश्चर्यकारक बाब म्हणजे या गंभीर घटनेनंतरही नीतू यांनी मारहाण करणाऱ्या आमदार थवानी यांनाच राखी बांधली. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.


संबंधीत मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर चहुबाजूंकडून जोरदार टीका सुरु झाली त्यानंतर थवानी यांनी संबंधीत महिलेची माफी मागण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे रुग्णालयात जाऊन नीतू यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले, ‘ती माझ्या बहिणीसारखी आहे. काल जे काही झाले त्याबद्दल मी तीची माफी मागितली आहे. त्यामुळे आमच्यामधील गैरसमज आता दूर झाले आहेत. तिला काही मदत लागली तर मी सदैव तयार असेल असे वचनही तिला दिले आहे,’ दरम्यान, पीडित महिलेकडून त्यांनी राखीही बांधून घेतली.

पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी नीतू तेजवानी नरोडामधील नागरिकांसोबत सोमवारी बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बलराम हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. दरम्यान, बलराम थवानी आणि त्यांच्या समर्थकांकडून नीतून यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

दरम्यान, ‘कोणीतरी मला मागून मारले. त्यानंतर मी कार्यालयाबाहेर आलो. त्यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली. त्या दरम्यान अपघाताने मी त्या महिलेला लाथ मारली असेल, असे घडायला नको होते’ असे स्पष्टीकरण बलराम थवानी यांनी दिले होते.