अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्यानंतर पाकिस्तानला जाणे त्यांनी टाळले. त्याचवेळी भारतासह संरक्षण क्षेत्रातील संबंध सुधारण्यावर भर दिला जाणार असल्याचे जाहीरही केले. या वृत्तामुळे पाकिस्तानला पोटशूळ उठला असून, ‘भारत-अमेरिका संबंधांमध्ये सुधारणा झाल्यास सामरिक समतोल ढासळण्याची भीती’ पाकिस्तानने व्यक्त केली आहे. या दोन देशांमधील सुधारणारे सामरिक संबंध दक्षिण आशियातील समीकरणे बिघडवणारे ठरतील, अशी टीकाही पाकिस्तानने केली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सल्लागार सरताझ अझीज यांनी बराक ओबामा यांच्या भारतभेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक मुद्दे उपस्थित केले होते. आण्विक पुरवठादार देशांमध्ये भारताला सहभागी करून घेण्याबाबत तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याबाबत अमेरिकेने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर तसेच भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्दय़ावर अझीज यांनी चिंता व्यक्त केली होती.
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्या तस्निम अस्लाम यांनीही त्याचीच री ओढली. भारताने मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्र खरेदी केल्यामुळे प्रादेशिक समतोल ढासळला आहे, असे त्या म्हणाल्या. २०१४-१५ या वित्तीय वर्षांत भारताने आपल्या संरक्षण खर्चात १२ टक्क्य़ांनी वाढ केल्यामुळे, तसेच अमेरिकेशी दहा वर्षांचा संरक्षण सहकार्य करार केल्यामुळे या भागातील समतोल बिघडणे स्वाभाविकच होते, अशी टीकाही अस्लम यांनी केली.

त्रिमितीय रचनेची अपेक्षा
पाकिस्तानला सामरिकदृष्टय़ा दक्षिण आशियात त्रिमितीय रचना अपेक्षित आहे. मतभेदाचे मुद्दे निकाली काढणे, आण्विक तसेच क्षेपणास्त्र अवरोध आणि पारंपरिक सामरिक समतोल हे तीन मुद्दे पाकिस्तानच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे अस्लम म्हणाल्या. परस्परांमधील विश्वास वाढीस लावणे तसेच शस्त्रास्त्र नियंत्रणावाचून दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित होणे शक्य नसल्याचेही अस्लम यांनी नमूद केले.

भारताला विरोध कायम
भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, या मागणीस आपला विरोध कायमच असेल, असे तस्निम अस्लम यांनी नमूद केले. जम्मू आणि काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेल्या अटींचे भारताने वारंवार उल्लंघन केल्याचा, तसेच काश्मिरी जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्कही भारताकडून डावलला जात असल्याचा आरोप अस्लम यांनी केला.