नव्या विधेयकात मद्यपी वाहनचालकांना १० हजार रुपये दंडाची तरतूद

सरकारने बुधवारी बहुप्रतीक्षित मोटर वाहन (सुधारणा) विधेयक २०१६ ला मान्यता दिली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला भरीव दंडाची तरतूद त्यामध्ये आहे. मद्यप्राशन करून गाडी चालविण्यासाठी १० हजार रुपये दंड तर हिट-अ‍ॅण्ड-रनप्रकरणी दोन लाख रुपये नुकसानभरपाईची तरतूद त्यामध्ये आहे.

त्याचप्रमाणे रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये नुकसानभरपाईचीही तरतूद या विधेयकात आहे. रस्ते सुरक्षित करून लाखो निष्पाप लोकांचे जीव वाचविण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

देशातील १८ राज्यांच्या परिवहन मंत्र्यांनी केलेल्या शिफारशींवरून हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून अतिवेगाने गाडी चालविल्याबद्दल एक हजार ते चार हजार रुपये दंडाचीही त्यमध्ये तरतूद आहे, असे गडकरी म्हणाले.विम्याविनाच गाडी चालविण्यासाठी दोन हजार रुपये दंड अथवा तीन महिन्यांचा कारावास, हेल्मेटविना गाडी चालविल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना स्थगित करण्याची तरतूद त्यामध्ये आहे. अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास त्याच्या पालकांना अथवा मालकाला दोषी ठरविण्यात येणार असून त्याच्या वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

  • वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड. अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न केल्यास दोन हजार रुपये दंड.
  • वाहनाचा विनापरवाना अनधिकृत वापर केल्यास पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे, विनापरवाना गाडी चालविणाऱ्यासही पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, अपात्र असतानाही गाडी चालविताना आढळल्यास किमान १० हजार रुपये दंड.