जागतिक बँकेचा आशावाद

येत्या पंधरा वर्षांत जगातील दारिद्रय़ दूर होईल पण त्यासाठी अनेक देशांना कठोर सुधारणा करणारे निर्णय घेऊन आर्थिक विकास घडवून आणावा लागेल, असे जागतिक बँकेच्या गटाने घाना येथील भेटीत म्हटले आहे.
जागतिक बँकेच्या गटाचे जिम योंग किम यांनी सांगितले की, देशांनी लोकांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. नागरिक पुन्हा दारिद्रय़ात जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. घानाची राजधानी अकरा येथे जागतिक दारिद्रय़ निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक बँकेला लोकांचे जीवनमान सुधारायचे आहे. २०३० पर्यंत दारिद्रय़ाचे उच्चाटन व विकसनशील देशातील तळागाळातील ४० टक्के लोकांची भरभराट झाली पाहिजे ही आमची उद्दिष्टे आहेत. पण २०३० पर्यंत दारिद्रय़ जर नष्ट करायचे असेल तर ते कठीण आव्हान आहे कारण जागतिक आर्थिक वाढ कमी आहे. वस्तूंच्या किमती कमी आहेत व व्याज दर जास्त आहेत. आशेचा किरण म्हणजे यावर्षी दिवसाला १.९० डॉलर्स कमावणाऱ्या लोकांची संख्या १० टक्क्य़ांपेक्षा कमी होऊन ९.६ टक्के असेल. आफ्रिकेतील दारिद्रय़ १९९० मध्ये ५६ टक्के होते ते २०१५ मध्ये ३५ टक्के इतके खाली आले आहे. लोकसंख्या वाढ हे अनेक देशांपुढील आव्हान आहे.