लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी भाजपाच्या ४ खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर सोमवारी लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा सादर केला. याद्वारे त्यांनी देशातील दोन मुलांच्या धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. या मसुद्यावर १२५ खासदारांनी सह्या केल्यानंतर तो राष्ट्रपतींसमोर सादर करण्यात आला.

मसुद्यात म्हटले की, दोन मुलांपेक्षा अधिक मुले झाल्यास त्यासाठी दंडात्मक कारवाईची तरतुद करण्यात यावी. तसेच जर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले तर त्याची ‘हम दो, हमारे दो’ या धोरणासोबत अंमलबजावणी करण्यात यावी. मात्र, भाजपा खासदारांच्या या कृतीवर विरोधकांनी टीका केली आहे. भाजपाचे हे पाऊल म्हणजे एक विशिष्ट अजेंडा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

भाजपाच्या मध्य प्रदेशातील ४ खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन १२५ खासदारांच्या समर्थनाची मसुदा राष्ट्रपतींसमोर मांडल्याचे भोपाळचे भाजपाचे खासदार अलोक संजर यांनी सांगत या वृत्ताला पुष्टी दिली आहे. या चार खासदारांपैकी एक असलेल्या गणेश सिंह सतना यांनी सांगितले की, जितक्या खासदारांनी या याचिकेवर सह्या केल्या आहेत, ते सर्व एनडीएचे खासदार आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसच्या मीडिया सेलचे अध्यक्ष मानक अग्रवाल यांनी म्हटले की, आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र, यासाठी केवळ भाजपाचे चारच खासदार राष्ट्रपतींकडे का गेले, त्याऐवजी सर्व पक्षानेच जायला हवे होते. तर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी म्हणाले, राजकीयदृष्ट्या संबंधीत खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्र्यांकडे हा विनंती अर्ज घेऊन जायला हवे होते.