उत्तर प्रदेशात मॅगीच्या नमुन्यात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) या हानिकारक पदार्थाचे मोठे प्रमाण आढळल्यानंतर आता इतर राज्यांतही मॅगीचे नमुने तपासण्यात येत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल हाती येणार आहेत. नेसले कंपनीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेले अभिनेते व अभिनेत्रींचे मॅगीच्या जाहिरातींतील दावे दिशाभूल करणारे असल्यास ते कारवाईला पात्र असल्याचे सरकारने म्हटले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा व प्रमाणन प्राधिकरणाने हे प्रकरण हाती घेतले असून, त्यांच्या मार्फतच कारवाई केली जाईल. आम्ही प्राधिकरणाला याबाबत लेखी कळवले आहे. ग्राहकांकडून मात्र मॅगीच्या विरोधात कुठल्याही तक्रारी आलेल्या नाहीत. तक्रारी न आल्यास आपण नेसलेवर कारवाई करू शकत नसल्याचे, अन्न व ग्राहक कामकाजमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले.
सरकारने याबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत ग्राहक कामकाज खात्याचे अतिरिक्त सचिव जी. गुरुशरण यांनी सांगितले, की सर्व राज्यांतून मॅगीचे नमुने घेण्यात आले असून, त्यांची तपासणी करण्यात येत आहे. काही अहवाल आज येणार असून उर्वरित अहवाल दोन-तीन दिवसांत मिळणार आहेत. चाचण्यांमध्ये सर्व घटकांची तपासणी केली जाणार आहे. जर मानकांचे उल्लंघन झाले असेल तर कारवाई केली जाईल, किंबहुना ग्राहक कामकाज मंत्रालय विशेष कारवाईखाली खटला दाखल करील.
मॅगीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्सवर कारवाई करणार का असे विचारले असता त्यांनी सांगितले, की त्यांनी केलेल्या जाहिरातीतील दावे चुकीचे असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल. नेसले इंडियाला ई-मेलवर प्रश्न पाठवण्यात आले होते, पण त्यांनी त्याची उत्तरे दिली नाहीत. गेल्या आठवडय़ात नेसले इंडियाच्या विरोधात उत्तर प्रदेशात भारतीय अन्नसुरक्षा व प्रमाणन प्राधिकरणाने स्थानिक न्यायालयात खटले दाखल केले होते. नेसले इंडिया व तिच्या उपकंपन्या यांच्यावर वेगळा खटला भरला आहे तसेच अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा व माधुरी दीक्षित यांनाही टू मिनिट नूम्डल्स जाहिरातीतील दाव्यांप्रकरणी न्यायालयात खेचण्यात आले आहे.

नेसलेसोबतचा करार संपला आहे. यामुळे आपण आता मॅगीची जाहिरात करीत नाही. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास करारामध्ये कंपनी आपल्याला कायदेशीर संरक्षण देईल, अशी अट त्यांना घालण्यात आली होती.
-अमिताभ बच्चन